'कोरोनाची लढाई आकडेवारीची नाही तर...' देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

Updated: May 30, 2020, 10:50 PM IST
'कोरोनाची लढाई आकडेवारीची नाही तर...' देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र title=

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. कोरोना रुग्णांना घरी सोडणाऱ्यांचा एकाच दिवशी वाढलेला आकडा आणि वाढत जाणारी मृत्यूंची संख्या याबाबत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. 

'कोरोनाग्रस्तांना घरी सोडताना त्यांच्या प्रकृतीबाबत योग्य ती खबरदारी न घेता, त्यांना घरी सोडलं जात असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. वांद्र्याच्या पोलीस स्टेशनमधल्या हवालदारांना १० दिवसानंतर सोडून देण्यात आलं. घरी सोडल्यानंतर अवघ्या काही क्षणात त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली. रुग्णवाहिका मिळवण्यासाठी त्यांना दोन तास संघर्ष करावा लागला, पण रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला,' असं फडणवीस म्हणाले. 

'४ एप्रिल ते २८ मे या कालावधीत प्रत्येक दिवशी सरासरी ३४४ रुग्ण घरी परतत आहेत. या ५४ दिवसांमध्ये १८,५६४ रुग्ण घरी परतले, पण काल २९ मेरोजी एकाच दिवशी ८,३८१ रुग्णांना घरी सोडल्याची माहिती राज्य सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आली. एकट्या मुंबईत ६,१९१ रुग्णांना घरी सोडल्याचं मुंबई महापालिकेने सांगितलं,' असं फडणवीस पत्रात म्हणाले. 

'कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही दिवसाला सरासरी ३६ एवढी आहे, पण मागच्या ४ दिवसात १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे रुग्णांना घरी सोडणाऱ्यांच्या संख्येत वाढ आणि दुसरीकडे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे.' असं फडणवीसांनी या पत्रात लिहिलं आहे. 

कोरोनाविरोधातील लढाई आकडेवारीची नाही, तर रोगाविरुद्ध आहे. त्यामुळे रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याचं भासवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.