ठाणे : लॉकडाऊन उठवल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येत असल्याचं वक्तव्य पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कळवा, मुंब्रा, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ज्या ठिकाणी संसर्ग वाढला आहे, त्या भागात नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन करण्यात येत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. लॉकडाऊन उठवल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींनी पुन्हा एका लॉकडाऊन करावं, अशी मागणी केली होती.
दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधताना ३० जूननंतर लॉकडाऊनचं काय होणार? याचं उत्तर दिलं. हळूहळू सोई-सुविधा उघडत जाणार, पण लॉकडाऊन उघडणार का? तर त्याचं उत्तर नाही, असं आहे. आपण सलून आणि पार्लर सेवा सुरू केली आहे. पण संकट अजून टळलेलं नाही. मिशन बिगीन अगेन आहे, पण धोका कायम आहे. अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी उघडत चाललो आहोत, काही गोष्टी उघडल्या म्हणजे धोका टळला असं नाही. गरज नसताना घराबाहेर पडू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
काही ठिकाणी पुन्हा पहिल्यासारखा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो, असे संकेतही मुख्यमंत्र्यांनी बोलताना दिले.