मुंबई : पुण्यापाठोपाठ मुंबईत कोरोनाच्या दोन रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरही चक्रावले आहेत. या रुग्णांना कोरोनाची लागण झाली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्यात या व्हायरसची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ही बाब चक्रावून टाकणारी असल्याचं म्हटलं आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरल्यानंतर तिथं अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. या रुग्णांमध्ये जी लक्षणं आढळली आणि त्याची लागण पुढे अधिकाधिक होत गेली.
चीनमधून कोरोना व्हायरस इटली, इराण, अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान आदी देशांत पसरतच गेला आणि भारतातही कोरोनाग्रस्त सापडले. पण भारतात सापडलेल्या काही रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणच दिसत नाहीत. तरीही त्यांची चाचणी पॉझिटीव्ह आढळली आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये विविध लक्षणं दिसतात. ताप येणं, अंगदुखी, सर्दी-खोकला अशी लक्षणं कोरोनाग्रस्तांमध्ये प्रामुख्यानं दिसतात. पण पुणे, मुंबईत सापडलेल्या काही रुग्णांमध्ये ही लक्षणंच दिसून आली नाहीत.
तरीही त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हा प्रकार चक्रावणारा आहे, असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
कोरोनाचे रुग्ण मुंबई, पुण्यात आढळले असले तरी लोकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. लोकांनी खबरदारी मात्र घ्यावी, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. महाराष्ट्रात सापडलेले कोरोनाचे रुग्णांची प्रकृती गंभीर किंवा अतिगंभीर नाही, असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
जगात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचा दर अडीच टक्के इतका आहे. त्यातही महाराष्ट्रात सापडलेल्या रुग्णांची स्थिती स्थिर आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असा दिलासाही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.