मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज मुंबईतल्या शिवडी न्यायालयात हजर राहणार आहेत. कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणाची सुनावणी शिवडी न्यायालयात सुरू आहे. या सुनावणीला राहुल गांधी न्यायालयात हजर राहणार आहेत. आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास राहुल गांधी शिवडी न्यायालयात पोहोचणे अपेक्षित आहे,. अध्यक्षपदापासून अधिकृतपणे दूर झाल्यावरही मुंबईत राहुल गांधींच्या स्वागताची कार्यकर्त्यांनी तयारी केली.
आपण आता काँग्रेस अध्यक्ष नाही, यापूर्वीच आपण राजीनामा दिला असून पक्षाच्या कार्यकारी समितीने लवकरात लवकर नवा अध्यक्ष निवडावा, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी आपला राजीनामाच जाहीर केल्यामुळे पक्षासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. राजीनामापत्र जाहीर केल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या ट्विटर हँडलवरून काँग्रेस अध्यक्ष या पदाचा उल्लेख काढून टाकला आहे. त्यामुळे ते राजीनाम्यावर ठाम असल्यावर शिक्कामोर्तब झालं असून आता पक्षाला लवकरच नवा अध्यक्ष शोधावा लागणार आहे.