दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते. मराठा आरक्षणावर राज्य सरकार तीन पर्यायांवर विचार करत आहे. अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका दाखल करणे आणि खंडपीठाकडे जाणे. पहिले दोन पर्याय शासनाला योग्य वाटत नाही. तिसरा पर्याय योग्य वाटतोय, असं देवेंद्र फडणवीस या बैठकीनंतर म्हणाले.
'सोमवार, मंगळवारपर्यंत ड्राफ्ट तयार करुन तो मुख्य न्यायमूर्तींकडे पाठवायचा. कायद्याला स्थगिती देता येत नाही, मग त्याठिकाणी आपण कमी पडलो का? पुन्हा घटनापीठाकडे सर्व तयारीनिशी जाऊ आणि आरक्षण कसं बहाल करता येईल, त्यासाठी प्रयत्न करू, असं आम्ही सरकारला सांगितलं आहे,' असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं.
'आम्ही सरकारबरोबर आहोत, यात कुठलंही राजकारण आणणार नाही. सरकार घटनापीठाकडे जाणार आहे, त्याला आम्ही पाठिंबा देऊ,' असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसंच आंदोलन हिंसक करु नये, महाराष्ट्र शांत कसा राहील याच भान ठेवा, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं.
'सरकारने मराठा समाजाला आश्वस्त केलं पाहिजे. जागा वाढवल्या तर संधी मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. या जागांवरील विद्यार्थ्यांची फी सरकारने प्रतिपूर्ती करावी,' अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.