मुंबई : आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडीच्या सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देखील आरोप केला. त्यांनी म्हटलं की, 'राहुल गांधीजी यांचे आजचे विधान तर अतिशय गंभीर आहे. स्वत:च्या जबाबदारीपासून पळणारे हे विधान आहे. त्यांच्या विधानावरून काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत.'
फडणवीसांनी आरोप केले की, 'राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर या सरकारची प्राथमिकता काय आहे, हे सहज लक्षात येईल. सध्या लढाई कोरोनाविरूद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्विरोधातून पडेल. सध्या कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत.'
'केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला 28,104 कोटी रूपयांची मदत मिळाली. केंद्राच्या पॅकेजमधून विविध क्षेत्रांचे जे प्राथमिक आकलन झाले, त्यातून 78,500 कोटी रूपये राज्याला मिळतील तसेच केंद्राच्या निर्णयांमुळे 1,65,000 कोटी रूपये वित्त उभारणीचे सहाय्य राज्याला मिळणार असून, यामुळे एकूण 2,71,500 कोटी रूपयांचा लाभ महाराष्ट्राला होईल,' असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
'राज्य सरकारने धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अतिशय वाईट आहे. रूग्णसंख्या/मृत्यू यात मोठी वाढ होत आहे. आता चाचण्यांची संख्या सुद्धा अतिशय कमी करण्यात आली आहे. काल केवळ 2900 चाचण्या केल्या आहेत. आता एकूण चाचण्यांपैकी 32 टक्के रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत.' असं ही ते म्हणाले.