मुंबई : मुंबईकरांना मधुमेहाने ग्रासले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत दररोज सरासरी २६ मुंबईकरांचा मधुमेहाने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईकरांचे आरोग्य बिघडत चालल्याचे हे लक्षण आहे. मुंबईतील आरोग्य यंत्रणेचे भीषण वास्तव प्रजा फाऊंडेशने उघड केले आहे. मुंबईकर वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहेत. त्यातही मधुमेहाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
त्या खालोखाल टीबीसारख्या संसर्गजन्य आजाराने दररोज पंधरा मुंबईकरांचा मृत्यू होत असल्याचीही माहिती समोर आली आहे. मुंबई शहरात ४० हजार नागरिकांमागे एक रुग्णालय आहे. तर पश्चिम उपनगरात ८६ हजार तर पूर्व उपनगरात ७२ हजार लोकांमागे एक रुग्णालय आहे.
अर्थसंकल्पात भरीव तरतूद असतानाही मुंबई महापालिकेचे रुग्णालयांकडे दुर्लक्ष असल्याचे प्रजा फाऊंडेशनने आपल्या अहवालात नमूद केले आहे. महापालिकेच्या दर एका दवाखान्यात सरासरी केवळ एकच कर्मचारी नियुक्त आहे. २०१८ मध्ये पालिकेच्या दवाखान्यांकरता संमत करण्यात आलेल्या पदकांच्या तुलनेत १९ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.