दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : झी २४ तासने पाठपुरावा केलेल्या एमपीएससी परीक्षा घोटाळा विषयावरून विधानसभेत गोंधळ झाला.
एमपीएससी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत विरोधकांचा स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रकरणातील घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत विरोधकांचा गोंधळ घातला. तसेच विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. तर जयंत पाटील यांनी मांडला स्थगन प्रस्ताव.
एमपीएससी परीक्षेतील डमी रॅकेट सरकारला माहित आहे. हे सगळं रॅकेट उद्ध्वस्त करायला हवं. सरकारने तातडीने कारवाई केली पाहिजे. २०० पेक्षा जास्त डमी उमेदवार आहेत.
एक हजार पेक्षा जास्त मुलं बोगसरित्या शासकीय सेवेत भरती झाली आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. तर हे प्रकरण गंभीर आहे. बराच कालावधीपासून हा घोटाळा सुरू आहे. एवढा मोठा घोटाळा आहे, पण सरकार त्याची दखल घेत नाही. जिल्ह्या जिल्ह्यात विद्यार्थी मोर्चे काढतायत. या विषयावर चर्चा झालीच पाहिजे. सरकार कुणाला पाठिशी घालतंय, असा सवाल राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला.
मुलं मरमर अभ्यास करतात. नको ती पोरं ढ आहेत ती दुसऱ्यांना परीक्षेला बसवतायत आणि पास होतायत. राज्याच्या प्रशासनात हे बोगस लोक कामाला लागलेत त्यांना कमी केलं पाहिजे. असं झालं तर बुद्धीमान मुलांचा कामकाजावरचा विश्वासच उडेल. त्यातून ते नाउमेद होतील आणि असंतोष निर्माण होईल. बोगस लोक क्लासवन अधिकारी झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. पात्रता नाही, लायकी नाही ते शासकीय सेवेत लागले आहेत, असे अजित पवार म्हणाले.
स्पर्धा परिक्षा डमी रॅकेट प्रकरणातील १५ आरोपींना एस.आय.टी ने अटक केली आहे. डमी रॅकेट प्रकरणात आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई असून, हे सर्व आरोपी हे डमी रॅकेटद्वारे राज्यातील विविध ठिकाणी नोकरीत सामील झाले होते.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मांडवी या छोट्याश्या गावातून ३० हून अधिकजण स्पर्धा परिक्षेमार्फत नोकरीत सामील झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर मांडवी येथील रहिवासी योगेश जाधव या तरुणानं या डमी रॅकेटचा पर्दाफाश केला होता. अटक करण्यात आलेल्या १५ आरोपींमध्ये ९ आरोपी हे मांडवी गावातील रहिवासी आहेत. तर, ३ जण किवनवट तालुक्यातील, १ माहुर तालुक्यातील, १ नांदेड शहरातील आणि १ आरोपी हिंगोली जिल्ह्यातील आहे.
हे सर्व आरोपी लाखो रुपये देऊन या रॅकेटमार्फत डमी परिक्षार्थी बसवुन शासनाच्या विविध खात्यात नोकरीला लागलेले आहेत. दरम्यान, या प्रकरणी एस आय टी प्रमुखांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.