मुंबई : Nana Patole on ED : केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे. केंद्रीय यंत्रणा त्रास देत आहेत. मात्र, सरकारला धोका नाही. ईडीच्या धाडीवरुन काँग्रेसचे नेते आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. भाजपला हे महागात पडेल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या 'पुष्पक ग्रुप'ची 6 कोटी 45 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ठाण्यामधील निलांबरी प्रोजेक्टमधील 11 फ्लॅट्स ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. त्यानंतर नाना पटोले यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. (ED attaches properties worth Rs. 6.45 Crore in the demonetization fraud case by the Pushpak Group of companies)
या कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर कडाडून हल्लाबोल चढवला. त्याचवेळी नाना पटोले यांनीही जोरदार टीका केली आहे. सध्या देशात महागाई वाढत आहे. देशातील जनता त्रस्त आहे. यावरचे लक्ष हटविण्यासाठी हे सगळे चालले आहेत. ईडीच्या कारवाईत काही बाहेर पडत आहे का? तर काहीही नाही. केवळ त्रास देण्यासाठी हेच चाललं आहे. छगन भुजबळ यांच्याबाबत काय झालं. काही नाही झालं, केवळ त्यांना तुरुंगात डांबलं गेलं, असे नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले यांनी म्हटले की, ईडीची कारवाई हा काही आता नवा विषय राहिला नाही. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करण्याचं काम केंद्रातील भाजपचं सरकार ठरवून करत आहे. विरोधकांवर केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन हल्ले करुन घाबरवण्याचं काम करत आहे. महागाई वाढली आहे. त्यामुळे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हे चालले आहे.
अशा कारवाईचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. हताश झालेली भाजप केंद्रात बसलेली आहे. देश विकणारी भाजप केंद्रात बसलेली आहे. त्यांच्या या अशा धमक्यांना महाविकास आघाडी घाबरत नाही. अनिल देशमुख यांच्याही प्रकरणात त्यांना कसलाही पुरावा मिळाला नाही. दररोज काहीतरी उकरुन काढायचा प्रयत्न ईडी करत आहे. या सगळ्याचा राज्य सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.