Mumbai : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. कोरोना उपचार आणि क्वारंटाईन सेंटर घोटाळ्याची (Quarantine Centre Scam) चौकशी सुरु करण्यात येणार आहे. याप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीने (ED) नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोना काळात वैद्यकीय उपकरणं खरेदी प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारपासून कोरोना काळात झालेल्या खरेदीच्या चौकशीला सुरुवात होणार आहे.
मुंबई महानगर पालिकेत कोरोना काळात ज्या स्वरुपाचं टेंडरिंग झालं, त्यात काही विशिष्ट कंपन्यांना टेंडर देण्यात आल्याचा आरोप आहे. या विशिष्ट कंपन्यांकडूनच वैद्यकिय उपकरणं खरेदी करण्यात आली होती. या संपूर्ण खरेदीची चौकशी ईडीमार्फत सुरु करण्यात आली आहे. याप्रकरणी ईडीने मुंबई महानगर पालिकेच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला नोटीस बजावल्याची माहिती आहे.
येत्या सोमवारपासून या चौकशीला सुरुवात होणार आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याची तक्रार सातत्याने विरोधी पक्षाकडून केली जात होती. पण कोरोना काळातील खरेदीला चौकशीच्या फेऱ्यात आणता येणार नाही असं मुंबई मनपाने सांगितलं होतं.
कॅगची चौकशी सुरु राहणार
कोरोना काळात झालेली खरेदी आणि कामावर झालेला खर्च सोडून इतर कामांची कॅगकडून (CAG) चौकशी सुरु राहणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याआधी कॅग आपला अहवाल सादर करणार आहे. कोरोना काळातील 3500 कोटींची कामं सोडून इतर 7500 कामांवरील खर्चाचं ऑडित केलं जाणार असल्याची सूचना राज्य सरकारने दिली होती. साथरोग अधिनियम कायद्यातील तरतुदीनुसार कोराना कामाच्या टेंडरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकत नाही.
याव्यतिरिक्त कोरोना सेंटरची उभारणी, रस्ते-बांधणी, जमीन खरेदी अशा सुमारे मुंबई मनपाच्या 76 कमांची कॅगकडून चौकशी करण्यात येत आहे. पण यातून कोरोना कामाची चौकशी वगळण्यात आली आहे.