Salman Khan Moving Farmhouse : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या मुंबईती वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर (Galaxy Apartment) गोळीबाराची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुजरातच्या भूजमधून दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींचा संबंध बिष्णोई गँगशी (Bishnoi Gang) असल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधल्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. खान कुटुंबाकडून सलमानला (Salman Khan) दुसरीकडे राहायला जाण्याचा सल्लाही दिला जातोय.
सलमान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार?
टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुार सलमान खान लवकरच गॅलेक्सी अपार्टमेंट सोडण्याची शक्यता आहे. अशात प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे सलमान खाने गॅलेक्सी अपार्टमेंट सोडलं तर तो कुठे राहायला जाईल, जी जागा जास्त सुरक्षित असेल. सलमानच्या जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खान आपला सर्वाधिक वेळ पनवेल इथल्या फार्महाऊसवर घालवतो. बिग बॉसच्या शुटिंगपासून हे ठिकाण जवळदेखील आहे. शहरात सलमानच्या सुरक्षेबाबत काहीसा धोका आहे. अशात सलमान खान पनवेलमधल्या फार्महाऊसवर कायमचा शिफ्ट होऊ शकतो असं बोललं जात आहे.
फार्महाऊसचीही झाली होती रेकी
सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहातो. कुटुंबासोबत एकत्र राहाता यावं यासाठी वन बीएचकेच्या घरात राहात असल्याचं सलमानने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आता सलमान फार्महाऊसवर एकटाच राहायला जाणार की कुटुंबासोबत राहायला जाणार याबाबत कोणताही स्पष्टता नाहीए. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दोन आरोपींनी सलमानाच्या घराबाहेर फायरिंग केली होती. त्यांनी सलमानच्या पनवेल इथल्या फार्महाऊसचीही रेकी केली होती. गोळीबाराच्या चार दिवस आधी ते या ठिकाणी आले होते. त्यामुळे सलमान खान फार्महाऊसवर राहायला जाण्याबाबतही साशंकता आहे.
सलमानच्या सुरक्षेत वाढ
दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. नुकताच सलमान खान नियोजित कार्यक्रमासाठी दुबईला गेला होता. यावेळचा विमानतळावरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सलमानच्या चारही बाजूला सुरक्षा रक्षकांचं कडं होतं. खासगी बॉडीगार्ड आणि पोलिसांचा वेढा सलमानला होता.
बिश्नोई गँगवर आरोप
सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईला आरोपी ठरवण्यात आलंय. मुंबई पोलीस क्राईम ब्रन्चने हा निर्णय घेतलाय. लॉरेन्स बिश्नोईसह त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईलाही याप्रकरणी क्राईम ब्रँचने वॉन्टेड यादीत दाखल केलंय. आत्तापर्यंत बिश्नोई भावांविरोधात मिळालेले पुरावे आणि साक्षीदारांवरून ही कारवाई करण्यात आलीय.त्यांच्यावर आईपीसी कलम 506 दोन , कलम 115 आणि कलम 201 दाखल करण्यात आलंय. इतकंच नाही तर क्राईम ब्रँच लवकरच बिश्नोईविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्याची शक्यताय.. तसंच बिश्नोईच्या कस्टडीची मागणी करण्यासाठी कोर्टाला अर्ज देणार असल्याचीही माहिती मिळतेय.