मुंबई : सध्या राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरु आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, तिसऱ्या लाटेतही पीक येण्याची शक्यता होती. दरम्यान यावरच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "तिसऱ्या लाटेचा पीक येऊन गेला आहे असं आता म्हणता येईल. कारण मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी रूग्णांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात आल्याचं दिसतंय. मात्र राज्याच्या इतर भागामध्ये रूग्णसंख्या वाढताना दिसतेय. नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद अशा मेट्रो सिटीजमध्ये अजूनही रूग्णसंख्या कमी होताना दिसत नाहीये."
मेट्रो शहरात रूग्णसंख्या वाढत असली तरीही चिंता करण्यासारखी परिस्थिती उद्भवलेली नाही. 5-7 दिवसांमध्ये रूग्ण बरे होतायत, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
राज्यात मास्क घालण्याच्या सक्तीतून सूट देण्याबाबत महाराष्ट्र सरकार विचार करत असल्याचे वृत्त समोर आले. मात्र यावर राज्यातील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी असे काहीही ठरलेले नाही, असे स्पष्ट केले. आदित्य ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र राज्यात मास्कची सक्ती हटवली जाईल, असा गैरसमज लोकांनी काढून टाकावा. मास्क हे स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यात चांगले हत्यार आहे, असे त्यांनीही स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्यातरी राज्यात मास्क घालणं बंधनाकारक आहे. मास्कमुक्ती संदर्भात महाराष्ट्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, हेच स्पष्ट होत आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क बंधनकारक आहे.