मुंबई : गेले दोन दिवस मुसळधार पाऊस (Rain) पडला आणि मुंबईकरांच्या पाण्याची (Mumbai water) चिंता मिटली आहे. पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने पाणीकपातीची टांगती तलवार मुंबईकरांवर होती. मुंबई महापालिकेने पाणीकपातीचे संकेत दिले होते. मात्र, दोन दिवस धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईत 2 दिवसांत जलसाठ्यात वाढ झाली आहे. तर दमदार पावसामुळे 7 तलावात पाण्याची भर पडली आहे. 7 तलावात दीड लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे.
गेल्या 24 तासांत बारवी धारणात समाधानकारक पाऊस झाला आहे. धरण 50 टक्के क्षमतेनं भरले आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात गेल्या 24 तासांत 182.50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत बारवी धरण क्षेत्रात 43.48 टक्के पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रात आतापर्यंत 1212.17 मिमी पाऊस झाला.
मुंबईत दोन दिवसांत संपूर्ण जुलै महिन्यातील 35टक्के पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत जुलै महिन्यात होणाऱ्या सरासरी 965 मिमी पावसापैकी 16 ते 18 जुलै या तीन दिवसांत 371.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीच्या कालावधीतच समुद्राला असणाऱ्या भरतीने फ्लड गेटने समुद्रात पाणी जाण्यापासून रोखले गेले. परिणामी मुंबईच्या विविध भागांत पाणी तुंबल्याचे प्रकार घडले.
दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असले तरी, या पावसामुळे मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत दोन दिवसांपूर्वी दोन महिने पुरेल इतका जलसाठा होता. मात्र त्यानंतर झालेल्या पावसामुळे तलावांत दीड लाख दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली असून आता जवळपास 109 दिवस पुरेल इतका जलसाठा आहे. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही तलावांमध्ये पाणीसाठ्यात भर पडली आहे.