कल्याण : एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारतरत्न सन्मान वाटपावरुन मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. ज्यांना भारतरत्न दिले, त्यापैकी किती दलित आहेत? किती आदिवासी आहेत? किती मुसलमान लोकांना भारतरत्न दिलं? असे सवाल त्यांनी कल्याणमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभेत बोलताना केले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरही त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं.
मोदी-फडणवीस तुम्हाला न्याय देणार नाहीत, ही शांत बसण्याची नाही तर पेटून उठण्याची वेळ आहे. आता रडून, तक्रारी करून काही होणार नाही. ज्या लोकांनी आम्हाला ७० वर्षे रडवलं, त्यांच्याविरोधात मी तुम्हाला साथ देतोय सर्वांनी एकत्र या, असं सांगतानाच प्रकाश आंबेडकरांना साथ देण्याचं आवाहन ओवेसींनी केलं.
तुमच्या मतांवर हे राज्य करीत आहेत आणि तुमच्या मुलांना जेलमध्ये टाकत आहेत. जोपर्यंत या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवाल तोपर्यंत पदरी निराशाच येणार आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं.
बाबासाहेबांनी देशाला संविधान देऊन सर्व समाजाला समान हक्क दिले. माणूस म्हणून जगण्याचा सर्वाना अधिकार दिला. मोदीजी सरदार पटेल नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणखी काही वर्षे जिवंत असते तर रोहित वेमुलाचा मृत्यू झाला नसता. बाबासाहेबांना जिवंत ठेवायचे असेल तर त्यांची स्वप्न पूर्ण करावी लागतील, असं ओवेसी म्हणाले.
आत्तापर्यंत देशाचे जेवढे पंतप्रधान झालेत ते सर्व चोर झालेत, असं वादग्रस्त वक्तव्य ओवेसींनी केलं. तसंच मी समाज तोडायला नाही तर समाज जोडायला आलोय, असं ओवेसींनी सांगितलं.
तिहेरी तलाक प्रतिबंध विधेयकाला कोणत्याही राष्ट्रीय पक्षानं विरोध केला नाही. फक्त आपण एकट्यानंच विरोध केला, अशी आठवण ओवेसींनी करून दिली. आमच्यासोबत मेहुल चोक्सी, अडानी आणि कॉर्पोरेट जग नाही. पण महाराष्ट्रात भाजप शिवसेनेला नक्कीच हरवणार असा विश्वास ओवेसींनी व्यक्त केला. शिवसेनेचा नेमका मामला काय आहे तेच समजत नाही. एवढे मोदींना का घाबरता, असा सवालही ओवेसींनी उपस्थित केला.