मुंबई : मुंबई विद्यापीठाने तब्बल १६०० विद्यार्थ्यांचे पदवी परीक्षांचे निकाल सरासरी मार्कांनी देण्याचा निर्णय घेतलाय... या १६०० उत्तरपत्रिका गहाळ झाल्या असून अखेर चार महिन्यांनी सरासरी मार्क देण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय. पण मुळात सरासरी मार्क कसे द्यायचे? हा प्रश्न विद्यापाठाला पडलाय.
पदवी परीक्षेच्या सहाव्या सेमिस्टरमध्ये इतर विषयांत जे मार्क मिळालेत त्या आधारावर गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकेच्या विषयाचे मार्क देण्याचा नवा फॉर्म्युला विद्यापीठात निश्चित होण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.
मुळात इंग्रजीच्या विषयावर इकॉनॉमिक्सचे मार्क कसे ठरवणार? असा प्रश्न विद्यार्थी वर्गातून विचारला जातोय. तर नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा चांगलाच फायदा होणार आहे. कारण सरासरी मार्क देताना विद्यार्थी नापास होणार नाहीत, याची काळजी घेतली जाणार असल्याचीही माहिती आहे.
सरासरी मार्क देण्याच्या निर्णयामुळे निकाल लावण्यापासून विद्यापीठाची सुटका होणार असली तरी पदवीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या निकालात विद्यार्थ्यांसोबत मात्र अन्याय होणार आहे.