मुंबई - नवी दिल्ली आणि मुंबई या दोन्ही महानगरांना जोडणारी आणखी एक राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणार असून, कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाँसी आणि आग्रा कॅंटोन्मेटमार्गे दिल्लीला जाणार आहे. सध्या दोन राजधानी एक्स्प्रेस मुंबईहून रोज नवी दिल्ली जातात. पण त्या पश्चिम रेल्वेवरून धावतात. त्यामुळे मुंबई आणि पालघर जिल्ह्यानंतर त्या लगेचच गुजरातमध्ये प्रवेश करतात. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवरून ही नवी राजधानी सुटणार आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागातून प्रवासी घेत दिल्लीला पोहोचणार आहे.
नवी राजधानी एक्स्प्रेस दर बुधवारी आणि शनिवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटेल. तर नवी दिल्ली स्थानकावरून ही गाडी गुरुवारी आणि रविवारी सुटेल. दिल्ली ते मुंबई हे अंतर ही गाडी २० तासांमध्येच पूर्ण करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी दुपारी २.२० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२० मिनिटांनी ती दिल्लीला पोहोचेल. दिल्लीहून हजरत निजामुद्दीन स्थानकावरून ही गाडी ३.४५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचेल. दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या गाड्या कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाँसी आणि आगरा कॅंटोन्मेट या स्थानकांवर थांबेल.
गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेवरून दिल्लीसाठी राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. सध्या मध्य रेल्वेवर मुंबई ते दिल्ली दरम्यान पंजाब मेल धावते. पण या गाडीने मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी २६ तासांचा कालावधी लागतो.