मुंबई : कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भानंतर भारतीय रेल्वेने (Indian Railway) मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील 6 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट (Platform Ticket) देण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या वाढत्या रुग्ण संख्येनंतर भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेत मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तातडीने थांबविली आहे. रेल्वे स्थानकातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
मध्य रेल्वेचे प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी सांगितले की, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (सीएसएमटी) येथे प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री थांबविण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर अनावश्यक गर्दी होऊ नये आणि सोशल डिस्टन पाळले जावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.'
या महिन्याच्या सुरुवातीला कोविड -19च्या साथीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्रातील काही प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत दहा रुपयांवरुन 50 रुपये केली होती. मात्र, 50 रुपये मोजण्याऐवजी काही प्रवाशांनी पुढच्या स्टेशनचे परतीचे तिकीट काढून या नियमाला फाटा दिला होता, अशी माहिती पुढे आली होती.
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे (Coronavirus) प्रमाण सतत वाढत आहे. गुरुवारी कोरोनाव्हायरस संसर्गाची 56,286 रुग्ण संख्या नोंदली गेली असून राज्यात एकूण संक्रमणाची संख्या 32,29,547 वर गेली आहे. यासह राज्यात आणखी 376 लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 57,028 वर पोहचला. महाराष्ट्रात बुधवारी 59,907 रुग्णसंख्या होती आणि 322 लोकांचा मृत्यू झाला.