Mumbai News : श्रीकृष्ण जन्माष्टमी (Janmashtami 2024) आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी असणारा गोपाळकाला या दोन्ही दिवशी संपूर्ण देशभरात धूम पाहायला मिळते. गोकुळाष्टमीचा हा उत्साह मुंबईमध्ये तुलनेनं सर्वाधिक असतो. निमित्त असतं ते म्हणजे शहरात ठिकठिकाणी आजोयत केली जाणारी (Dahihandi) दहीहंडी. सानथोर गोविंदा विविध गोविंदा पथकांमध्ये सहभागी होत या दिवसाचा आनंद लुटताना दिसतात. पण, उत्साह आणि उत्सवाला कोणतंही गालबोट लागू नये यासाठी आता प्रशासनानं सतर्क होत काही महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
अशा दिवसांमध्ये, किंवा उत्साहाच्या भरात अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी फेकणे आणि अश्लील बोलणे यामुळे बऱ्याचदा तणावाची परिस्थिती निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते. ज्यामुळं मुंबई पोलिसांनी गोकुळाष्टमीच्या धर्तीवर काही निर्देश जारी केले आहेत.
26 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून लागू असणारी ही नियमावली 27 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत लागू होणार आहे. यामध्ये जारी नियमांच उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमंतर्गत कारवाई करण्यात येईल असा थेट इशाराही देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात आणि शहरात घडणाऱ्या घटना आणि तत्सम प्रकार पाहता कायद्याला आव्हान देणाऱ्या कोणाहीची हयगय केली जाणार नाही, अशाच भूमिकेत सध्या पोलीस यंत्रणा दिसत असून, हुल्लडबाजी करणाऱ्यांची आता खैर नाही हेच त्यांच्या एकंदर भूमिकेवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळं गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करा, पण कुठंही उत्सवाला गालबोट लागणार नाही अशी कृत्य करूही नका आणि अशी कृत्य घडत असल्यास जबाबदारीनं ती थांबवण्याचा प्रयत्न करा.