मुंबई : संपूर्ण महाराष्ट्र हा विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत असताना, अचानक आलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे ज्वारी, बाजरी आणि कापूस पिकाला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे.
ज्वारी आणि बाजरी ही कोरडवाहू पिकं आहेत. आता कणसं भरली असताना, सततच्या पावसाच्या माऱ्याने कणसातलं धान्य काळं पडलं आहे. काही ठिकाणी तर ज्वारी, बाजरीला कोंब फुटले आहेत.
ऑक्टोबर महिना हा शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस घेऊन येतो. शेती माल काढण्याचे हेच दिवस असतात. पण शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास खाली पडला असल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
सततच्या पावसामुळे भाजीपाला, तसेच फळं महागण्याची देखील चिन्हं दिसून येत आहे, तसेच कांदा पिकालाही याचा मोठा फटका बसला आहे. कोकण विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी सर्वाधिक नुकसान दिसून येत आहे.