मुंबई : भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी आज संजय राऊत यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी शिवथाळी कोण कुणाला देता हे पाहूच असा प्रहार केला आहे. 'भाजप महिला कार्यकर्त्यावर हल्ला झाला हे निंदनीय. संजय राऊत प्रसाद दिला अशी भाषा करतात. शिवथाली देऊ असं म्हणतात, कधी कोणाच्या कानफडात तरी मारलीये का? असा सवाल देखील त्यांनी केलाय. नारायण राणे यांनी जुहू येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांवर निशाणा साधला.
संजय राऊत यांना शिवसेनेचा इतिहास काय माहित. आम्ही त्यावेळचे शिवसैनिक मिळून जमवलेल्या पैशातून सेना भवन इमारत उभी राहिली. आत्ताचे तुमचे मुख्यमंत्री हिंदुत्वाला तिलांजली दिलेले आहेत. संजय राऊत नक्की शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत? सारखं पवार साहेबांच्या तर सान्निध्यात असता. शिवसेनेचा पुळका हा स्वार्थापोटी. स्वतःला सांभाळा नाहीतर तुमच्या वाट्याला कधी शिवथाली येईल समजणार नाही. असं देखील राऊतांनी म्हटलं आहे.
'आज बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. जिथे शिवसैनिकांना स्थान नाही. मुख्यमंत्री आता भेटत नाहीत. तुमचं सेना भवन मंदिर आहे. आमच्यासाठी राम मंदिर अस्मिता आहे. या हल्ल्याची परतफेड झाल्याशिवाय झोपणार नाही. शिवसेनेला सिंधुदुर्गात चालायला देणार नाही.' असं आव्हान देखील त्यांनी दिलं आहे.
'बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका करत होता. त्यावेळचे अंक माझ्याकडे आहेत. तुम्ही शिवसेनाप्रमुखांवर कोणत्या भाषेत टीका केली ते 'प्रहार’मध्ये छापू का? असा इशाराही त्यांनी दिला. माझ्या सारख्या शिवसैनिकांनी स्वत: वर्गणी दिली आणि वर्गणीही जमवून दिली. तेव्हा शिवसेना भवन उभं राहिलं. तुमचं योगदान तरी काय? तुम्ही नोकरीला आला. तुम्ही कधी शिवसैनिक आणि नेता झालात हे सांगणार नाही. तुम्ही शिवसेना वाढवण्यासाठी काय केलं?' असा सवालही नारायण राणे यांनी केला.