मुंबई : महाविकास आघाडी घडवण्यात ज्यांचा हात होता, त्याच राऊतांमुळे आघाडी मोडली नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीये. महाविकास आघाडी अस्तित्वात आणणारे राऊत आता व्हिलन का झालेत, बघुयात हा स्पेशल रिपोर्ट. (maharashtra political crisis shiv sena mp sanjay raut mahavikas aghadi government collapse)
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी केलेलं हे ट्विट, 'आपल्याच लोकांनी दगा दिला' या ठाकरेंच्या वाक्याचा आधार घेत राऊतांनी ट्विटमधून शिंदेंवर निशाणा साधला. त्याला भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विटरवरूनच उत्तर दिलं. कर्मा रिटर्न्स असं लिहित 2019मध्ये शिवसेनेनं भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं कार्टून राणेंनी शेअर केलं. यानिमित्तानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा 'खंजीर'ची चर्चा सरू झालीय.
अडीच वर्षांपूर्वी भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून बिनसलं आणि महाविकास आघाडी जन्माला आली. मात्र या सत्तासंघर्षादरम्यान संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून भाजपला अंगावर घेतले. कुणी कुणाला धोका दिला हे सांगण्याच्या चढाओढीत राऊत सर्वात पुढे होते.
राऊतांच्या धारदार आरोपांमुळे भाजप-शिवसेनेतलं केवळ अंतरच वाढलं नाही तर संबंधांमध्ये कटुताही आली. त्यामुळे भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर असलेल्या शिवसेना नेत्यांच्या मनात राऊतांबद्दल रोष वाढला. याशिवाय
मविआ स्थापनेपूर्वीपासून शरद पवारांशी राऊतांची जवळीक हा कायमच वादाचा विषय राहिलाय. शिवसेनेचे खासदार असताना राष्ट्रवादीसाठी काम करतात, असा आरोप त्यांचे स्वपक्षीयही करतात. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाताना राऊतांनी शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेल्याचाही आरोप होतोय.
सतत माध्यमांमध्ये दिसत राहिल्यामुळे पक्षांतर्गत द्वेष वाढीला लागला. जनतेमधून निवडून आलेल्या शिवसेना नेत्यांना राऊतांचं पक्षातलं वाढतं वजन खटकलं. त्यातही बंडखोरीनंतर राऊतांनी गुवाहाटीत गेलेल्या आमदारांवर जहरी टीका केली. त्यामुळे संतापलेले बंडखोर आणखीनच आक्रमक झाले
अनेक बंडखोर आमदारांनी शिवसेनेतल्या अंतर्गत नाराजीला राऊतच जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यामुळे बंडखोर आमदारांना त्रास होत असेल तर आपण बोलणार नाही, असं राऊत म्हणाले खरे, मात्र हे आश्वासनही फार काळ टिकलं नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचा आरोप होत असला तरी शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जवळीक करण्यास संजय राऊतच कारणीभूत असल्याची प्रतिमा जनमानसात निर्माण झाली. आणि या फुटीमुळेच सरकार कोसळ्यामुळे राऊतच व्हिलन असल्याचा आरोप होतोय.