असा असणार महाशिवआघाडीचा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला?

महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे. 

Updated: Nov 20, 2019, 08:16 PM IST
असा असणार महाशिवआघाडीचा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला? title=

नवी दिल्ली : महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये किमान समान कार्यक्रम ठरवला जात आहे. यासाठी दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांच्या दिल्लीमध्ये बैठका सुरु आहेत. याचवेळी तिन्ही पक्षांमधल्या सत्तास्थापनेच्या संभाव्य फॉर्म्युलाची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपद, राष्ट्रवादी काँग्रेसला १५ मंत्रिपद आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदं मिळू शकतात. तसंच अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद मिळू शकतं.

दरम्यान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गैरभाजप सरकार स्थापन होईल, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिलीय. पण शिवसेनेनं जातीय अजेंडा राबवला तर काँग्रेस सरकारमधून बाहेर पडेल, असं सांगितलं जातंय.

सोनिया गांधी यांनी शिसेनेसोबत जाण्यास संमती दिली, त्यामुळे महाराष्ट्र राज्यात १ डिसेंबर आधी शिवमहाआघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. तसे संकेत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहेत.

भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र काँग्रेसमधून काही नेत्यांचा तसेच खुद्द सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यास विरोध केल्याची माहिती होती. अखेर सोनिया गांधी यांचे मन वळविण्यात शरद पवार यांना यश आल्याचं बोललं जातंय.