संजय राऊत यांना आधी जेल, नंतर जामीन...विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राऊत वि. सोमय्या

Sanjay Raut : खासदार संजय राऊतांना न्यायालयानं दिलासा दिलाय. अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना जामीन मंजूर झालाय. 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याचा संजय राऊतांनी मेधा आणि किरीट सोमय्यांवर आरोप केला होता. त्यानंतर मेधा सोमय्यांनी राऊतांविरोधात कोर्टात धाव घेतली होती.

राजीव कासले | Updated: Sep 26, 2024, 08:48 PM IST
संजय राऊत यांना आधी जेल, नंतर जामीन...विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राऊत वि. सोमय्या title=

मनोज कुळकर्णीसह, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) कोर्टाने ताप्तुरता दिलासा दिलाय. कारण अब्रुनुकसानीच्या खटल्यात राऊतांना जामीन मंजूर झालाय.. मेधा सोमय्या (Medha Somaiya) आणि किरीट सोमय्यांवर 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता.. त्यानंतर मेधा सोमय्यांनी राऊतांविरोधात कोर्टात धाव घेतली होती.

काय आहे प्रकरण?

- मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केल्याचा संजय राऊतांचा आरोप

- आरोपाचे पुरावे द्यावेत असं आव्हान किरीट सोमय्यांनी राऊतांना दिलं

- कोणतेही पुरावे न दिल्यानं मेधा सोमय्या यांनी राऊतांवर 100 कोटींचा मानहानीचा दावा केला

- संजय राऊत यांना यापूर्वीच मानहानी, बदनामीची नोटीस दिली होती

- माझगाव कोर्टानं राऊतांना 25 हजारांचा दंड, 15 दिवसांची कैद सुनावली

- काही वेळातच 15 हजारांच्या जातमुचलक्यावर राऊतांचा जामीन मंजूर

- अपील करण्यासाठी संजय राऊतांना 30 दिवसांची मुदत

राऊत म्हणतात 'आम्ही संघर्षातले शिलेदार'

या प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी आम्ही संघर्षातले शिलेदार असल्याचं म्हटलं आहे. मला जेलमध्ये ज्यांना पाठवायचे त्यांना पाठवू द्या, सत्तेसाठी संघर्ष आम्ही करतो आणि त्यासाठी जेलमध्ये पाठवायचं असेल तर आम्ही तयार आहोत आम्ही डरपोक नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मी खरं बोलतोय माझ्याकडे पुरावे आहेत मी ते दाखवले आहेत भ्रष्टाचारासंदर्भातले माझ्या आधी अनेकांनी आरोप केलेले आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

खासदार संजय राऊतांच्या आरोपांमुळे मनस्ताप झाल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्त्या मेधा सोमय्या यांनी केला. तर संजय राऊतांना न्यायालयानं दोषी ठरवल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. ठाकरे सरकारच्या काळात पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही, आम्ही कोर्टात गेलो आज आम्हाला 28 महिन्यांनी न्याय मिळाला, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे खासदार संजय राऊत हे घाबरत नाहीत, ते लढत राहतील अशी प्रतिक्रिया, शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलीय. तर भाजपविरोधातही अब्रुनुकसानीचा दावा करायला पाहिजे, असा हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपवर केलाय. जामीन मंजूर झाल्याने राऊतांना तात्पुरता दिलासा मिळालाय. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आता राऊत विरुद्ध सोमय्या असा सामना रंगण्याची शक्यता आहे.