Weather Update : अखेर दिवसागणिक तीव्र झालेली ऑक्टोबर हीट आता बहुतांशी तिची तीव्रता कमी करत असून, महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात घट नोंदवली जात आहे. दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्या तरीही पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळी मात्र पारा खाली येत असल्यामुळं राज्यात थंडीची चाहूल लागलीये ही बाबा नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसारही राज्यातील किमान तापमानात घट नोंदवण्यात आली आहे.
इथं नवी मुंबई, ठाणे आणि पालघर भागांमध्ये संध्याकाळच्या वेळी तापमानात घट होत असून, हा गारवा पहाटेपर्यंत काही अंशी वाढताना दिसत आहे. तर, तिथं जळगावमध्ये सर्वात कमी, 10.9 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांमध्ये ऑक्टोबर हीटचं प्रमाण आणखी कमी होऊन तापमानात बऱ्याच अंशी घट नोंदवनली जाणार आहे. परिणामी तापमानाचा आकडा 37 अंशांवरून मोठ्या फरकानं कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिथं कोकणातही कमाल तापमान 36 अंशांखाली आलं असून, किमान तापमानाचा आकडाही कमी झाला आहे. तर, राज्यातील निफाडमध्ये किमान तापमानाचा आकडा 13 अंशापर्यंत पोहोचला आहे. सातारा, कोल्हापूर आणि घाटमाध्यावरील परिसरात दाट धुक्याची चादर पाहायला मिळत असल्यामुळं आता या भागाकडे पर्यटकांचे पाय वळताना दिसत आहेत.
Skymet या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार सध्या तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरामध्ये दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं आता या वादळाकडेही यंत्रणांचं लक्ष आहे.
पुढील 24 तासांमध्ये देशातील केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि अंदमान निकोबार बेट समूहांमध्ये मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसू शकतात. तर, पूर्वोत्तर भारतामध्येही पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज आहे. दृश्यमानतेसंदर्भात सांगावं तर, दिल्ली आणि मुंबईत धुरक्याचं प्रमाण एकसारखंच राहणार असून, काही भागांमध्ये मात्र परिस्थिती बिघडताना दिसेल.