मुंबई : देशातल्या ९१ मतदारसंघांसह पूर्व विदर्भातल्या सात मतदारसंघांमध्ये गुरुवारी पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान पार पडले. महाराष्ट्रात सरासरी ६२ टक्के मतदान झाले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी घसरली आहे. लोकशाहीच्या उत्सवाला देशवासियांचा चांगला प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, तेलंगणासह ९१ मतदारसंघात शांततेत मतदान झाले. एकूण १२७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उत्तर प्रदेशात ६३ तर पश्चिम बंगालमध्ये ८१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
नागपूर आणि भंडारा गोंदिया वगळता इतर मतदारसंघांमध्ये मतदान घटल्याचे आतापर्यंत आलेल्या आकड्यांनुसार दिसते आहे. यामुळे विदर्भातल्या वाढत्या उन्हामुळेच मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटलेल्या मतदानाचा तोटा नेमका कुणाला होणार याचीच आता चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, गडचिरोली येथे नक्षवाद्यांनी हल्ला घडवून आणला. नक्षलवाद्यांकडून मतदान पथकावर हल्ला करण्यात आला. येथील तुमरिकासा गावातील मतदान केंद्रानजीक हा प्रकार घडला. नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे गडचिरोलीमधील मतदानप्रक्रिया ३ वाजता संपली. यानंतर मतदान पथकातील कर्मचारी ईव्हीएम यंत्रे आणि इतर साहित्ये घेऊन हेलिकॉप्टरच्या दिशेने जात असताना नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला आणि अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात मतदान पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सी-६० पथकातील तीन कमांडो जखमी झालेत.
विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघात मतदान झाले आहे. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि, वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मदानाला सुरुवात झाली होती. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विदर्भातल्या सात जिल्ह्यांमध्ये ५५. ७८ टक्के मतदान झाले. वर्ध्यात ५५.३६ टक्के, रामटेकमध्ये ५१.७२ टक्के, नागपुरात ५३.१३ टक्के, भंडारा गोंदियात ६०.५० टक्के, गडचिरोली चिमूरमध्ये ६१.३३ टक्के, चंद्रपुरात ५५.९७, यवतमाळ वाशिममध्ये ५३.९७ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख मतदार आहेत. त्याच्यासाठी एकूण १५ हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण ११ हजारांवर सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.