मुंबई : सत्तेसाठी पक्षांतर करणा-यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोला हाणलाय. सत्ता आली की लोक उंदरांसारखे इकडून तिकडे उड्या मारतात, असं सांगताना देशात पक्षांतर रोखणारा कायदा असायला हवा, असंही ते म्हणाले. झी 24 तासच्या अनन्य सन्मान सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
सामाजिक बांधिलकी जपत प्रेरणादायी वाटचाल करणा-या ८ उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना गुरूवारी झी 24 तास अनन्य सन्मान देऊन गौरवण्यात आलं. राजकारणातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेले शेकापचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांना यावेळी झी 24 तास अनन्य जीवनगौरव देऊन सन्मानित करण्यात आलं.
पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक करणारे शूरवीर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचाही या हृदयस्पर्शी सोहळ्यात खास सत्कार करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झी 24 तास अनन्य सन्मान प्रदान करण्यात आला.