मुंबई : पुढल्या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनोखी प्रकट मुलाखत रंगणार आहे. ज्यांची मुलाखत आहे, ते एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.. तर मुलाखत घेणारेही दुस-या एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या मुलाखतीमुळं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावणार, एवढं नक्की...
एक आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले सुप्रसिद्ध काका. आणि दुसरा आहे काकांचा हात धरून राजकारणात आलेले आणि आता स्वतःच काका झालेले राजकारणी नेते. एकानं काँग्रेसला रामराम करून आपल्या पक्षाची वेगळी चूल मांडली. तर दुस-यानं शिवसेनेला जय महाराष्ट्र करून महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी स्वतंत्र सेना स्थापन केली.
होय. आम्ही बोलतोय त्यापैकी एक आहेत शरद पवार. ५० वर्षांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष. आणि दुसरे आहेत राज ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष. येत्या 3 जानेवारीला शरद पवारांची पुण्यात प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आलीय. आणि ती मुलाखत घेणार आहेत साक्षात राज ठाकरे.
व्यंगचित्रकार या नात्यानं राज ठाकरेंनी याआधी अनेकदा शरद पवारांना कुंचल्याचे फटकारे लगावलेत. तर 'राजकारणात यायचं तर सकाळी लवकर उठावं लागतं,' अशा शब्दांत पवारांनीही राज ठाकरेंना कानपिचक्या दिल्यात. त्यामुळं या मुलाखतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा पवार विरूद्ध ठाकरे अशी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.
शरद पवारांची मुलाखत राज ठाकरेंनी घ्यावी, ही संकल्पना जागतिक मराठी परिषदेचे सर्वेसर्वा रामदास फुटाणे यांची...त्यांनी तसा प्रस्ताव शरद पवारांपुढं ठेवला.... आश्चर्य म्हणजे पवारांनाही ही संकल्पना आवडली.ठाकरेंनीही मुलाखतकार म्हणून पवारांवर प्रश्नांच्या तोफा डागण्याची नेमकी संधी हेरली. पण आपण विचारलेले थेट आणि परखड प्रश्न पवारांना रूचतील का?
पवार त्यांना मनमोकळी उत्तरं देतील का? अशी शंका राज ठाकरेंकडून उपस्थित करण्यात आली. पवारांनीही कुठल्याही अटी आणि शर्ती न ठेवता, सगळ्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं द्यायचं कबूल केलं. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला हा अत्यंत दूर्मिळ योग जुळून आला.
राज ठाकरे या मुलाखतीत आता नेमकं काय विचारणार आणि शरद पवार त्यावर काय उत्तरं देणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. शरद पवारांचा काँग्रेस, पुलोद, पुन्हा काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास, त्यांच्यावर झालेले विविध आरोप, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी त्यांची असलेली जवळीक या आणि अशा अनेक विषयांच्या अनुषंगाने ठाकरेंच्या भात्यातून प्रश्नांचे बाण येण्याची शक्यता आहे.
अलिकडंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भेटीचा गौप्यस्फोट करून पवारांनी खळबळ उडवून दिली होती. तो गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंना रुचला नव्हता. आता शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यातील सवाल-जवाबाच्या सामन्यात आणखी कोणते गौप्यस्फोट होणार, याकडं सा-यांचंच लक्ष लागलंय. पवार आणि ठाकरे यांच्यातला हा वाद-संवाद शिवसेना नेतृत्वाला अस्वस्थ करू शकेल, अशीही शक्यता आहे.
शरद पवार यांचे राजकारण म्हणजे न उलगडणारं कोडं असा सार्वत्रिक समज आहे. त्यामुळे एका बाजूला काँग्रेसशी मैत्री, दुसरीकडे भाजपशी वाढती जवळीक, तर त्याचवेळी उद्धव ठाकरेंशी गुप्त भेटीगाठी करताना राज ठाकरेंशीही जाहीर संवाद साधत पवार त्यांचं राजकीय डावपेचांचे कोडं अधिक गडद करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.