मुंबई : मनसेच्या इंजिनासोबतचा प्रवास थांबवून शिवसेनेच्या शिवबंधनात अडकलेल्या 'त्या' सहा जणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या तापल्या वातावरणाचा फटका बसून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शिवसेना नेतृत्व आणि पोलीस प्रशासन यांनी आपापल्या परीने योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळे 'ते' सहाजण सध्या अज्ञात स्थळी आहेत. तर, त्यांचे कुटुंबिय राहात असलेल्या निवासस्थानी पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
नुकतेच शिवबंधनात अडकलेले 'ते' सहा जण सध्या कुठे आहेत? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. प्रत्यक्षात मात्र मातोश्रीसह शिवसेनेतील मोजके शिलेदार वगळता त्याची काणोकानी खबर इतर कोणालाच नसल्याची सूत्रांची माहिती आहे. काहींच्या मते ते नुकतेच शिवबंधनात अडकल्यामुळे ते त्यांचा राजकीय मधुचंद्राचा काळ सुरू आहे. दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, परमेश्वर कदम, डॉ.अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर आणि हर्षला मोरे अशी या नगरसेवकांची नावे आहेत.
दरम्यान, त्या सहा जणांचे पक्ष सोडून जाणे हे मनसेच्या फारच जिव्हारी लागले आहे. मुळात गेल्या काही वर्षात मनसेची प्रचंड प्रमाणात पडझड सुरू आहे. त्यातच गेल्या महानगरपालिका निवडणुकीत कसेबसे ७ नगरसेवक पक्षाच्या हाती लागले होते. त्यामुळे पक्षातील मरगळ कशी झटकायची या विचारात नेतृत्व होतेच. त्यातून पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात मोर्चा काढत तसेच, फेसबुक पेजवरून केलेली ग्रॅण्ड एण्ट्री केली. नोटबंदी, जीएसटी आदी मुद्द्यांवरूनही त्यांनी थेट मोदींवर निशाणा साधत वातावरण तापविण्यास सुरूवात केली. यातून मनसेला सूर सापडत आहे, असे चित्र निर्माण होऊ लागले होते. तेवड्यात शिवसेनेने बाण मारला आणि अवघा मनसेच गारद झाला.
'त्या' सहा जणांच्या पक्षांतराने मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे पहायला मिळत आहे. काही कार्यकर्त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंजवर हजेरी लाऊन जोरदार घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्या नगरसेवकांच्या पक्षांतराचा त्रास त्यांच्या कुटुंबियांना होऊ नये यासाठी या सहाही नगरसेवकांच्या घराला आणि कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आज शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, नियमानूसार कोकण आयुक्तांसमोर नगरसेवकांच्या गटाची नोंदणी झाली नसल्यानं या सर्वांना अज्ञात स्थळी ठेवण्यात आलं असून, हे सहाही नगरसेवक आपल्या घरी नसल्याची माहिती आहे.