Mumbai Car Accident 2 Died: बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते तसेच 'सन ऑफ सरदार' चित्रपटाचे दिग्दर्शक अश्विनी धीर यांना पुत्रशोक झाला आहे. त्यांचा 18 वर्षांचा मुलगा जलाज धीर याचा रस्ते अपघातामध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या कार अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या जलाजचा मृत्यू झाला. पश्चिम द्रुतगती मार्गावर विले-पार्लेमध्ये जलाज आणि त्याचे मित्र प्रवास करत असलेली भरधाव वेगातील कार दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
जलाज हा रात्री उशीरा त्याच्या मित्रांबरोबर वांद्रे येथून गोरेगावला जात होता. यापैकी 18 वर्षीय साहिल मेंदा नावाच्या त्याचा मित्र कार चालवत होता. साहिल हा मद्यधुंदावस्थेत कार चालवत होता अशी माहिती समोर येत आहे. सहारा स्टार हॉटेलजवळ साहिलचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट सर्व्हिस रोड आणि ब्रिजदरम्यान असलेल्या दुभाजकाला धडकली.
या अपघातामध्ये जलाज आणि त्याचा सार्थ कौशिक नावाचा 18 वर्षीय मित्र मरण पावला. या दोघांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणामध्ये अपघातग्रस्त कारमध्ये असलेल्या जेडन जिमी नावाच्या 18 वर्षीय तरुणाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी साहिलविरुद्ध तक्रार दाखल करुन त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांना साहिलच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी गोळा केले असून आता त्याच्या रक्तामध्ये मद्याचा अंश आहे की नाही याच्या पडताळणीसाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
जिमीने नोंदवलेल्या जबाबानुसार, तो आणि साहिल दोघेही टॅक्सीने जलाजच्या गोरेगावमधील घरी गेले होते. 22 तारखेची संध्याकाळी एकत्र असतानाच सर्वांनी अंधेरीमध्ये राहाणारी त्यांची मैत्रीण जिया मेहता (18) हिला भेटायला जाण्याचं ठरवलं. सर्वजण सायंकाळी साडेसातच्या सुमारास रिक्षाने जियाच्या घरी पोहोचले. तिच्या घरी साहिलने व्होडकाचे दोन शॉट्स प्यायले तर जिमीने एक पेग व्होडका घेतल्याचं जबाबामध्ये सांगितलं. जिमी आणि साहिलनंतर पुन्हा रात्री 11 वाजता जलाजच्या घरी गेले. त्यानंतर या तिघांना भेटण्यासाठी सार्थक तिथे आला. काही तास व्हिडीओ गेम खेळल्यानंतर सगळ्यांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास वांद्रे येथे ड्राइव्हला जाण्याचं ठरवलं. आधी काहीवेळ जिमीने कार चालवली नंतर साहिलने कार चालवायला घेतली. पहाटे 4.10 च्या सुमारास कार वांद्रे येथे पोहचली. त्यानंतर परत येताना साहिल हा 120 ते 150 किलोमीटर प्रती तास इतक्या वेगात कार चालवत होता असं जिमीने म्हटलं आहे.
सहारा हॉटेलजवळ पोहचल्यानंतर सर्व्हिस रोडने जायचं की ब्रिजवरुन हे न कळल्याने साहिलचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट डिव्हायडरला आदळली. जिमी आणि साहिलला किरकोळ दुखापत झाली तर जलाज आणि सार्थक गंभीर जखमी झाले. जिमीने अन्य दोन व्यक्तींच्या मदतीने जलाजला जोगेश्वरी पूर्वमधील ट्रॉमा रुग्णालयात दाखल केलं. तिथून जलाजला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तिथे त्याला मृत घोषित केलं गेलं.जिमी सार्थकला भाभा रुग्णालयात घेऊन गेला असता डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केलं. त्यानंतर जिमीने साहिलविरुद्ध तक्रार दाखल केली.