Mumbai News : कोव्हिड सेंटर कथित घोटाळा प्रकरणी ईडीने 10 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाणांच्या घरावरही ईडीने धाड टाकली. तर अधिकारी संजीव जैस्वाल, नितीन गुरव, राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, संजय शाह यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे. कोव्हिड सेंटर बनवण्यासाठी वापरलेल्या साहित्यात घोटाळा केल्याचा आरोप यांच्यावर आहे. या संबंधित कंपन्यांकडून फायदा मिळवल्याचा आरोप असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
सूरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानाबाहेरून झी 24 तासनं आढावा घेतला असता तिथं ईडीच्या अधिकाऱ्यांसह इतरही काही मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. बुधवारी सकाळच्या सुमारास ईडीचं एक पथक इथं दाखल झालं. मुंबई महानगरपालिकेलीत भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहारांची कारणं देत ही छापेमारी झाल्याचं कारण पुढे करण्यात येत आहे.
सदर प्रकरणामध्ये सुजित पाटकर यांचंही नाव गोवलं गेल्याचं कळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि प्रविण दरेकर यांनी या घडामोडींवर आपली प्रतिक्रिया दिली. लाइफलाइन हॉस्पिटलच्या माध्यमातून संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्यावर ईडीने छापे टाकले आहेत. यांना हिशोब तर द्यावाच लागेल असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. तर दरेकरांनी सांगितल्याप्रमाणे, जे जे कोविड सेंटर आणि महापालिकेच्या वतीने घोटाळा झाला आहे त्यासंदर्भात ही कारवाई होत आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कोविड काळात प्रचंड खर्च झाला. त्याच संदर्भात ही चौकशी होत असावी.
19 जून 2023 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेचा उल्लेख करत तब्बल 12500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप झाला होता. यावेळी त्यांनी तत्कालिन महाविकास आघाडी शासनावर ताशेरे ओढत हे घोटाळेबाज सरकार होतं अशा शब्दांत तोफही डागली. दरम्यान कॅगच्या अहवालासून या कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती उघड झाल्याच्या वृत्ताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुजोरा दिला होता. ज्याच्या पुढील चौकशीसाठी सरकारकडून SIT स्थापन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
(सविस्तर वृत्त प्रतीक्षेत)