Dombivli Crime : गेल्या काही वर्षांपासून घरगुती वादातून हिंसाचाराचा अनेक घटना समोर आल्या आहेत. पण संस्कृत आणि आधुनिक जगाचं रुप दाखवणाऱ्या मुंबईत याच घरगुती वादाने टोक गाठलं आहे. पती पत्नीमधील वाद इतका टोकाला गेला की, नवऱ्याने आपल्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. (Mumbai News)
महिलेने पतीविरोधात डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर हा भयानक प्रकार समोर आला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचं हे लव्ह मॅरेज होतं. तीन वर्षांपूर्वी डोंबिवलीतील एका मंदिरात यांचं प्रेमाचं सूत जुळलं. त्यानंतर त्यांनी प्रेमाला 6 मार्च 2020 लग्नाच्या पवित्र बंधनात बांधलं.
कल्याण शीळ फाटावरील एका हायप्रोफाईल सोसायटीत संसार करत होते. सुरुवातीला सगळं ठिक होतं पण काही दिवसांमध्ये पतीने दुसऱ्या लग्नासाठी पीडित महिलेला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. दीड वर्ष ती पतीचा त्रास सहन करत होती.
पण गेल्या काही दिवसांपासून पतीचा त्रास वाढत होता. एकादिवशी स्वतःच्या बेडरूममध्ये पतीने मोबईल कॅमेऱ्यातून गुपचूपपणे दोघ शारीरिक संबंध ठेवत असतानाचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर पतीने लोखंडी सळीने मारहाण करत तो व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करुन व्हायरल केला. पीडित पत्नीला या व्हायरल व्हिडीओबद्दल समजल्यावर तिने जाब विचारल्यावर त्याने परत शिवीगाळ करुन मारहाण केली. महिलेचा अश्लील व्हिडीओ 10 मार्च 2022 ला काढला होता.
आता पाणी डोक्यावरुन गेलं होतं. पीडित पत्नीने पोलिसांकडे धाव घेतली. अखेर पीडित महिलेने 11 मार्च 2023 मानपाडा पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली. पुढे दोन दिवस उलटून गेले पतीने अजून एक कारनामा केला. त्याने पत्नीच्या मोबाईलमधील काही फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले. एवढंच नाही तर मी दुसरं लग्न करणार आहे, असं पत्नीला सांगितलं.
त्या महिलेच्या पतीने भिवंडी तालुक्यातील एका तरुणीशी गुपचूप साखरपुडा केला होता. धक्कादायक म्हणजे येता 29 एप्रिल 2023 ला तिचा नवरा दुसरं लग्न करणार होता. तिने परत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली आणि तिची कोणी तक्रार नोंदवून घेतली नाही.
अशावेळी त्या पीडित महिलेने पोलीस उपआयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी 8 एप्रिल 2023 ला तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला. पण अजूनही तिच्या नवऱ्याला अटक झाली नसल्याने आता त्या महिलेने राज्य महिला आयोगा आणि पोलीस आयुक्तांकडे अर्ज केला आहे. या अर्जात तिने पतीविरोधात गंभीर आरोप केले आहेत.
त्या अर्जामध्ये पीडित महिलेने हेही सांगितलं आहे की, तिच्या आई-वडिलांचं 25 मार्च 2023 ला पतीने अपहरण केलं होतं. पोलिसात तक्रार करुन नवऱ्याला अटक न झाल्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे. पतीसोबत त्याचे नातेवाईक या सगळ्यात सहभागी असल्याचही तिने या अर्जात सांगितलं आहे.