मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग लवकरच चौकशीला सामोरं जाणार असल्याची माहिती आहे. परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची माहिती आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत.
लवकरच चौकशीसाठी मुंबईला येणार असल्याचं स्वत: परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून परमबीर सिंह कुठे आहेत असा प्रश्न विचारण्यात येत होता. याला आता स्वत: परमबीर सिंह यांनी उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh)यांना फरार घोषित करण्यात आलं आहे.
परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत परमबीर सिंग जर न्यायायलयासमोर हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला होता. गोरेगावच्या एका प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते, मात्र त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात सध्या पाच खंडणीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी गोरगांव येथील खंडणी प्रकरणाचा तपास करणार्या गुन्हे अन्वेषण विभागानं परमबीर यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं.