कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात जगातला सर्वात मोठा ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलंय. उत्तर प्रदेशातून आलेल्या रूग्णावर तिथल्या डॉक्टरांनी उपचार करण्यास असमर्थता दर्शवली होती. पण नायर रूग्णालयाच्या डॉक्टर्सनी अत्यंत गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया करून १ किलो ८७३ ग्रॅम वजनाचा ट्यूमर बाहेर काढला.
संतलाल पाल या ३१ वर्षीय रुग्णाचा शस्त्रक्रियेपूर्वीचा फोटो पाहिल्यानंतरच त्याला असलेल्या ब्रेन ट्यूमर आजाराची दाहकता समजून येते. वर्षभरापासून हा ब्रेन ट्यूमर वाढत गेला आणि त्याच्या वेदनाही वाढत गेल्या.
मेंदूमध्ये ट्यूमरचा काही भाग घुसलेला तर उर्वरीत भाग कवटीतून बाहेर आलेला. अनेक रक्तवाहिन्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या. त्यामुळे ही सर्जरी करणं म्हणावी तितकी सोपी नव्हती. त्यामुळंच उत्तर प्रदेशातल्या अनेक रूग्णालयांनी ही शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवली. पण नायर रुग्णालयाच्या न्युरोसर्जरी विभागातील डॉक्टरांनी हे आव्हान पेलले आणि आठवड्यापूर्वी यशस्वी शस्त्रक्रिया करून १ किलो ८७३ ग्रँम वजनाचा जगातील सर्वात मोठा ब्रेन ट्यूमर बाहेर काढला.
सहा सर्जनच्या टीमने सलग सहा तास ही शस्त्रक्रिया केली. यावेळी तब्बल ११ बाटल्या रक्त लागले. त्यानंतर तीन दिवस रुग्ण व्हेंटीलेटरवर होता. आता संतलाल धोक्याबाहेर असून तो पुढील आयुष्य नॉर्मल जगू शकेल असा विश्वास डॉक्टरांना आहे. रुग्ण बरा झालेला पाहून कुटुंबियांनीही समाधान व्यक्त केलं.
डॉक्टर नाडकर्णी आणि त्यांच्या टीमनं जगातील सर्वात मोठा ब्रेन ट्यूमर बाहेर काढून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्यांचा स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आहे. २००२ मध्ये त्यांनी केईएम रूग्णालयात असताना १ किलो ४०० ग्रॅम वजनाचा ब्रेन ट्यूमर बाहेर काढला होता, जो आतापर्यंत सर्वात मोठा ब्रेन ट्यूमर म्हणून त्याची नोंद होती.
एवढ्या मोठ्या ब्रेन ट्यूमरमुळं संतलालच्या दृष्टीवरही परिणाम झाला असून दृष्टी अधू झाली आहे. जी पूर्ववत होण्यास काही कालावधी जावा लागणाराय. ही शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात केली असती तर 3-4 लाख रुपयांचा खर्च आला असता, परंतु नायर रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आलीय.