Mumbai News : अंधेरीतील (Andheri) वाहतूक समस्या (Traffic) सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) मुंबईच्या एन.एस. फडके जंक्शन ते तेली गली (अंधेरी पूर्व) दरम्यान गेल्या पाच वर्षांपासून पूल बांधण्यात येत आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये पुलाचे काम सुरू झाले होते. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. याच कामाचा भाग असलेला तेली गल्ली पूल अंधेरी पूर्वेला पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि अंधेरी पश्चिमेला एस.व्ही. रस्त्याने थेट जोडला जाणार आहे. अंधेरी पूर्व येथील हॉटेल रिजन्सी जंक्शन आणि तेली गली जंक्शन येथील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार होता. मात्र आता महापालिकेने या भागासंदर्भात महत्त्वाचा आदेश दिला आहे.
मिड डेच्या वृत्तानुसार, अंधेरी इथल्या गोखले पुलाचा काही भाग पुन्हा बांधण्याचे आदेश मुंबई महापालिकेने कंत्राटदाराला दिले आहेत. अंधेरी येथील तेली गल्लीतून गोखले पुलाला जोडणारा भाग सहा महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आला होता. मात्र आता तेली गली कनेक्टरचा काही भाग पुन्हा तयार केला जाणार आहे. यासंदर्भात पालिकेने कंत्राटदाराला निर्देश दिले आहेत. अधिकार्यांनी सांगितले की, अद्याप सुरुही न झालेल्या या ब्रिजवर असमान चढउतार आढळून आल्यामुळे आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही. दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे आता पुन्हा सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याने त्यांनी महापालिकेवर टीका केली आहे.
"हा सगळा मूर्खपणा आहे. पुलाचा हा भाग अवघ्या 6-7 महिन्यांपूर्वी पूर्ण झाला असून, इतक्या कमी कालावधीतच पुलाची अशी अवस्था झाली आहे. आता हीच परिस्थिती असेल, तर पूल लोकांसाठी खुला झाल्यावर आणि वाहनांसाठी त्याचा वापर सुरू झाल्यावर काय होईल, याचा विचार करुनही भीती वाटते. ब्रिटिशकालीन पूल 100 वर्षांहून अधिक काळ टिकून आहेत. याआधी बीएमसीने बांधलेले उड्डाणपूलही 40-50 वर्षे टिकले होते. पण अवघ्या अर्ध्या वर्ष्यात पुलाची ही अवस्था आहे," असे स्थानिकांनी म्हटलं आहे.
या कामाबद्दल महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, "आम्हाला या पुलाची तपासणी करताना सुमारे 10 चौरस मीटरच्या पृष्ठभागावर काही असमान चढउतार आढळले. त्यामुळे आम्ही कंत्राटदाराला हा भाग काढून तो पुन्हा तयार करण्यास सांगितले आहे. कंत्राटदार त्याच्या खर्चाने हा भाग तयार करणार आहे."
रिजन्सी हॉटेल आणि तेली गली जंक्शनवरील अडथळे कमी करण्यासाठी हा बायपासचा भाग तयार करण्यात आला आहे. या पुलाची लांबी 570 मीटर असून त्याची किंमत सुमारे 150 कोटी रुपये आहे. मात्र आता वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला गोखले पुलाला जोडणारा तेली गल्ली पूल सुरु करण्यापूर्वीच तोडला जात आहे.