Mumbai News : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अवकाळीचं सावट असलं तरीही मुंबई, नवी मुंबई आणि नजीकच्या भागात मात्र उकाडा दर दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. इतकंच नव्हे, तर या वाढत्या उकाड्यामुळं आता नागरितांच्या आणि लहानग्यांच्या आरोग्यवरही परिणाम होताना दिसत आहेत. उष्णता वाढलेली असतानाच मे महिन्याच्या सुट्टीचे दिवसही आता सुरु झाले आहेत. त्यामुळं उत्साहाच्या भरात अनेकदा बाहेरचं खाणंपिणंही सुरु असल्यामुळं अनेक लहानग्यांच्या आरोग्यावर त्याचे अनिष्ठ परिणाम होताना दिसत आहेत.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या शहरातील लहान मुलांमध्ये गॅस्ट्रो (पोटाचे विकार) चे रुग्ण वाढत असून, अतिसार, उलट्या या आणि अशा समस्यांसह अनेक मुलांचे पालक त्यांना रुग्णालयांमध्ये घेऊन येत आहेत. अस्वच्छता, संक्रमित अन्नपदार्थ, वायरल संक्रमण अशा अनेक कारणांमुळं या समस्यांमध्ये भर पडताना दिसत आहे.
दक्षिण मुंबईतील रुग्णालयांसाठी काम पाहणाऱ्या बालरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार इथंही दर दिवशी ओपीडीमध्ये येणाऱ्या 30 ते 35 रुग्णांपैकी 10 रुग्ण गॅस्ट्रोचे असल्याचं पाहायला मिळत आहे. लहानग्यांना या आजारपणातून सावरण्यासाठी साधारण 4 ते 5 दिवस किंवा त्याहून अधिक काळ लागत आहे. यामध्ये रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्यामुळं आरोग्य यंत्रणांना हा मोठा दिलासा आहे.
वाढत्या तापमानामुळं अनेक प्रकारच्या जीवजंतूंच्या वाढीस वाव मिळतो, यातूनच विषाणूंचं संक्रमण वाढून त्याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. परिणामी, सध्याच्या दिवसांमध्ये बाहेरचं खाणं टाळण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. घरच्या घरीसुद्धा अन्नपदार्थ साठवून ठेवताना ते व्यवस्थित न ठेवल्यास अशा पदार्थांमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. अशा अन्नपदार्थांच्या सेवनामुळंच पोटाचे विकार वाढत आहेत. सध्याच्या दिवसांमध्ये शक्य तितक्या थंड पदार्थांचं सेवन केल्यास अशा संक्रमणांचा धोका टळतो. याशिवाय पदार्थ व्यवस्थित शिजवून घेणं, उकळलेलं पाणी पिणं या लहान गोष्टीसुद्धा मोठ्या मदतीच्या ठरतात.