Mumbai University On Job Training: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) साठी तरतूद करण्यात आली आहे. यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला असून, इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना आता छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात कार्यांतर्गत प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) उपलब्ध होणार आहे.
नुकत्याच मुंबई विद्यापीठ आणि छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयातील उभयांतमध्ये याअनुषंगाने बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. इतिहास विभागातील दुसऱ्या सत्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षणादरम्यान क्युरेटर, गाईड, संग्रहालय प्रदर्शनाचे आयोजन, जतन आणि संवर्धनाचे तांत्रिक ज्ञान देण्यात येईल. यासोबतच संग्रहालय, संग्रह व्यवस्थापन आणि वारसा संवर्धन या अनुषंगिक बाबींचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकेल असे इतिहास विभागप्रमुख प्रा. संदेश वाघ यांनी सांगितले. तसेच येत्या काळात बॉम्बे नेच्युरल हिस्ट्री सोसायटीसोबतही कार्यांतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या डोसेंट प्रोग्राम अंतर्गत इतिहास विभागातील निवडक विद्यार्थी येथे कार्यरत असून भविष्यात या कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे इतिहास विभागातील प्राध्यापिका आणि छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाच्या विश्वस्त प्रा. मंजिरी कामत यांनी सांगितले. हे कार्य करीत असताना विद्यार्थ्यांना प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इतिहासकारांसोबत संवाद साधण्याची संधीही उपलब्ध होऊ शकेल असेही त्यांनी सांगितले.
'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण अनिवार्य आहे. यासाठी विद्यापीठातील विविध विभागांनी पुढाकार घेतला असून त्यानुसार अभ्यासक्रम तयार करण्यात आले असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. उद्योन्मुख क्षेत्रातील गरजा आणि संधीनुसार विद्यार्थ्यांना शिकतानाच प्रात्याक्षिक ज्ञान, अनुभव आणि प्रशिक्षण उपलब्ध व्हावे याअनुषंगाने इतिहास विभागातील दुसऱ्या सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात कार्यांतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून हा अत्यंत स्तूत्य उपक्रम असल्याचे कुलकर्णी म्हणाले.