मुंबई : एका हाकेवर मुंबई बंद पाडणारी शिवसेना बेस्ट संपात मात्र हतबल झाल्याचं दिसत आहे. बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेत ५०० बस रस्त्यावर उतरवण्याची डरकाळी केली खरी, पण ही डरकाळी केवळ फुसकी ठरली. शिवसेना एकही बस रस्त्यावर उतरवू शकली नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे स्वत चर्चेत उपस्थित राहूनही मार्ग काढू शकले नाहीत. बेस्ट आणि महापालिकेत सत्तेत असतानाही प्रशासन ऐकत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. मुंबईत शिवसेनेचा आवाज कमी पडतोय का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कामगारांच्या संपाचा तिढा अजूनही कायमच आहे. मुंबई उच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेवर दिवसभर सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने संप मिटवण्याबाबत कोणताही आदेश दिलेला नाही. उद्या सकाळी राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास आणि परिवहन सचिव यांच्या त्रिसदस्यीय समितीने बैठक घेऊन बेस्ट संपाबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना न्यायालयाने आज राज्य सरकारला केली. तर शुक्रवारी संध्याकाळी होणाऱ्या संपकरी बेस्ट कामगारांच्या बैठकीत संपाबाबत निर्णय घेतला जाईल, असे संपकरी बेस्ट कृती समितीच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. याबाबत येत्या सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरल्यामुळे बेस्ट संपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज चौथ्या दिवशीही संप सुरूच आहे. बेस्टच्या वीज पुरवठा संघटनेचे कर्मचारीही या संपात आजपासून उतरले आहेत. तब्बल सहा हजार वीज कर्मचाऱ्यांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आज मुंबई अंधारात बुडण्याची भीती आहे. संप न मिटल्याने मनपा कर्मचाऱ्यांनीही संपात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाचे चतुर्थ श्रेणी कामगार या संपात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे हाल आणखी वाढण्याची भीती आहे.
दरम्यान, बेस्टच्या संपाबाबत मुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी सकाळी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यानंतर मध्यस्थी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. ते आश्वासन उद्धव ठाकरेंना दिले आहे. त्यामुळे उद्या चौथ्या दिवशी हा संप मिटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.