मुंबई : काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केलेल्या नारायण राणे यांना भाजपाने दिलेले आश्वासन काही पूर्ण होताना दिसत नाही. ३१ डिसेंबरपूर्वी राणे यांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांना दिलं होतं. मात्र, नवीन वर्ष सुरु झाले तरी काहीही हालचाल होताना दिसत नसल्याने आश्वासन गाजर ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे.
मंत्रीमंडळात ३१ डिसेंबर पूर्वी स्थान मिळाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तसा त्यांनी शब्द दिल्याचे राणे यांनी नुकतेच झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले होते. मात्र आता ३१ डिसेंबरची मुदतही उलटून गेली आहे. त्यामुळे राणे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय.
डिसेंबरच्या तिसर्या आठवड्यात राणे यांनी नागपूर येथे जाऊन यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिल्याचे राणे यांनी विशेष मुलाखतीत सांगितले होते. राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, अशी शक्यता होती. मात्र अनेक दिवस वाट पाहिल्यानंतर राणेंनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला.
या पक्षाने भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णयही घेतला. तेव्हाच राणेंचा मंत्रीमंडळात समावेश करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले होते. दिवाळीपूर्वी राणेंचा मंत्रीमंडळात समावेश होईल, अशी तेव्हा चर्चा होती. मात्र तेव्हा राणेंचा मंत्रीमंडळात समावेश झाला नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना ३१ डिसेंबरपूर्वीचा शब्द दिला होता. तो शब्दही पाळला न गेल्यानं भाजप राणेंना झुलवत ठेवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.