राष्ट्रवादीकडून १५ 'संशयित' आमदारांची वेगळ्या हॉटेलमध्ये व्यवस्था

अजित पवार यांचा पक्षातील प्रभाव पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी दगाफटका होण्याची भीती आहे.

Updated: Nov 25, 2019, 06:10 PM IST
राष्ट्रवादीकडून १५ 'संशयित' आमदारांची वेगळ्या हॉटेलमध्ये व्यवस्था title=

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांचे समर्थक मानले जाणाऱ्या १५ 'संशयित' आमदारांची वेगळ्या हॉटेलमध्ये रवानगी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ५० आमदारांपैकी ३५ आमदारांना ग्रँड हयात हॉटेलवर ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित १५ आमदारांची व्यवस्था बीकेसीच्या सोफिटेल हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, जे आमदार शनिवारी शपथविधीच्या दिवशी अजित पवार यांच्यासोबत गेले होते त्यांचा या १५ जणांच्या गटात समावेश आहे. या आमदारांकडून इतर आमदारांनाही फितवले जाऊ शकते, असा संशय राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. त्यामुळे या १५ आमदारांवर विशेष पाळत ठेवली जात आहे. 

महाआघाडीचं शक्तीप्रदर्शन, १६२ आमदारांचे एकत्र फोटोसेशन

भाजप नेत्यांच्या दाव्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमधील २५ ते २७ आमदारांचा गट अजित पवार यांच्या पाठिशी आहे. भाजपसोबत न गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेस फुटेल, असा संदेशही मध्यंतरी अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापर्यंत पाठवला होता. अजित पवार यांचा पक्षातील प्रभाव पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी दगाफटका होण्याची भीती आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आम्ही शरद पवार यांच्या बाजूने असल्याचे सांगत असले तरी बहुमताच्या परीक्षेवेळी सभागृहात या आमदारांच्या निष्ठा कायम राहतील का, याबाबत अजूनही शंका आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून अजूनही अजित पवार यांची मनधरणी केली जात असल्याची चर्चा आहे.

सिंचन घोटाळ्यातील अजित पवारांविरोधातील चौकशीच्या फाईली बंद

दरम्यान, थोड्यावेळात महाविकास आघाडीच्या १६२ आमदारांची बैठक हॉटेल ग्रँड हयात या ठिकाणी बोलवण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. याठिकाणी महाआघाडीच्या १६२ आमदारांचे एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेड होईल.