देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, नवी मुंबई : हार्बर मार्गावरचं सीवूड दारावे हे स्टेशन भविष्यात नवी मुंबईची ओळख बनणार आहे... हे रेल्वे स्थानक आणि या स्थानकाच्या आसपासच्या परिसराचा केला गेलेला कायापालट यामुळे या भागालाच वेगळी ओळख मिळणार आहे. सिडको, रेल्वे आणि एलएनटी या कंपनीच्या माध्यमातून रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जातोय... एखाद्या विमानतळाच्या इमारतीचं किंवा एखाद्या भव्य व्यापारी संकुलाच्या इमारतीचं मॉडेल वाटेल... पण नाही... हे आहे हार्बर रेल्वे मार्गावरचं सीवूड दारावे रेल्वे स्थानक... खरंतर नवी मुंबईतली रेल्वे स्थानकं भव्य दिव्य... अत्याधुनिक सोयींनी सज्ज... पण आता सीवूड दारावे हे स्थानक त्याच्याही एक पाऊल पुढे टाकतंय...
रेल्वे स्थानकातून खालच्या बाजूने रेल्वेगाड्यांची ये जा होते... मात्र स्टेशनच्या भव्य इमारतीत वरती भव्य मॉल, सबवेमध्ये विविध ब्रॅन्डच्या शोरूम, मुख्य इमारतीत बँका आणि कॉर्पोरेट हाऊसेसची कार्यालयं आहेत. स्टेशनमध्ये दुचाकी चारचाकींसाठी भव्य पार्कींगतर आहेच पण त्याचसोबत रेल्वे स्थानकाच्या वर प्रचंड मोठं फॅमिली एंटरटेन्मेंट सेंटर साकारत आहे. अशा पद्धतीने विकसीत होत असलेलं देशातलं हे पहिलं रेल्वे स्थानक आहे... अशी स्थानकं परदेशात अनेकांनी पाहिली असतील पण आता या सुविधा असलेलं सीवूड दारावे हे भारतातलं पहिलं स्थानक...
इमारतीतच विविध कंपन्यांची कार्यालयं आहेत. त्यामुळे गाडीतून उतरल्यावर थेट कार्यालयात हे सुख अनेक कर्मचारी अनुभवत आहेत. स्वतःचं वाहन घेऊन येणाऱ्यांनाही पार्कींग शोधण्याची कटकट नाही... स्टेशनमध्येच असलेलं भव्य पार्कींग ही जमेची बाजू.
विमानतळासह अनेक मोठे प्रकल्प नवी मुंबईत साकारत आहेत. सीवूड दारावे स्थानक हा त्यातीलच एक भव्य प्रकल्प... देशभरातल्या १०० स्थानकांचा विकास करण्याचा रेल्वेचा मानस आहे... त्या दृष्टीने सीवूड दारावे स्थानकाचं काम हे रोल मॉडेल असणार आहे.