मुंबई : मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत घूसखोरी केली नसल्याचा दावा ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. आपण बैठकीत प्रवेश केला असल्याची केवळ अफवा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मराठा आरक्षणाला आपला आधीपासूनच पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. उपसमितीची बैठक सुरू असताना पंकजा मुंडे या तावातावानं बैठकीत गेल्या आणि मराठा आरक्षणाच्या टक्केवारीबाबत त्यांनी उपसमितीच्या सदस्यांना विचारणा केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर तातडीनं पंकजा मुंडे यांनी याबाबत खुलासा करत असं काहीही घडलं नसल्याचं सांगितलं. मात्र माध्यमांशी संवाद साधत असताना गिरीश महाजन देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठकीत प्रवेश करत पंकजा मुंडे यांनी किती आरक्षण देणार अशी विचारणा केली. यावेळी त्या रागात होत्या अशी देखील चर्चा आहे.
जर मराठा आणि कुणबी यांचा एकत्र सर्व्ह केला असेल तर मराठा आरक्षणाचा 16 टक्का एवढा आला. जर फक्त मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर कुणबी समाजाला सर्व्हेत का गृहीत धरलं. कुणबी समाजाला आधीच आरक्षण आहे. मग मराठा आरक्षणाचा टक्का कमी होईल. असा सवाल देखील त्यांनी केल्याच्या चर्चा आहेत. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं देखील बोललं जात आहे. पण पंकजा मुंडे यांनी यानंतर पत्रकारांशी बोलताना हे सर्व खोटं असल्याचं म्हटलं आहे.