मुंबई : बेळगाव महापालिका निकालावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. बेळगाव निकालावरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली होती. 'आज महाराष्ट्रात मराठी माणूस हरला म्हणून पेढे वाटले जातायत. इतकी गद्दारी कुणी केली नव्हती. लाज नाही वाटत का? अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही, मराठी माणूस पराभूत होऊच शकत नाही, बेळगावामध्ये संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपाच्या (BJP) निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये 15 पेक्षा जास्त मराठी लोक आहेत. त्यामुळे मराठी माणसाचा पराभव आणि एका पक्षाचा पराभव या दोन गोष्टी सारख्या राहू शकत नाही' असं सांगत फडणवीसांनी संजय राऊतांवर उत्तर दिलं आहे.
बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव घडवून आणला गेला आहे, अनपेक्षित निकाल आहे हा, कर्नाटकाच्या सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून आणला, बेळगावर मराठी माणसाचा हक्क राहू नये यासाठी काय गडबड केली त्याची माहिती बाहेर येईलच, असं राऊत म्हणाले होते. 'बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसं मेली. बाळासाहेब तुरुंगात गेले, गोपीनाथ मुंडेही एकीकरण समितीच्या पाठिशी होते, राजकारण नव्हते यात आणि तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला होता.