मुंबई : निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्ष आणि नेत्यांचा प्रचार सुरु होतोच. पण इथे तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट व्हाट्सअॅप मेसेजच करतात. विश्वास बसत नसेल ना. मग ही बातमी पाहा. कृतिका या महाविद्यालयीन तरुणीला आलेला हा व्हाट्सअॅप संदेश पाहा. नरेंद्र मोदी यांचा डीपी आणि नाव असलेला संदेश.. मोदी विचारतात, कृतीका..मग कृतिका म्हणते जी, मोदीजी? मग मोदीजी तिला थेट स्टार प्रचारकम्हणून निवडणूकीत प्रचार करण्यासाठी दिल्लीला बोलवत आहेत. हा संदेश पाहून कृतिका आणि तिचे सगळेच मित्र भारावून गेलेत. मग त्यांनीही मोदींना संदेश पाठवलेत..विशेष म्हणजे या सगळ्याच मुलांना नरेंद्र मोदींकडून संदेश येतायत. ही सगळी धम्माल आहे फेसबुकवर व्हायरल झालेल्या 'नरेंद्र मोदी आपके बारे में क्या सोचते है?' या खेळाची. काही तासातच फेसबुकवरचा हा गेम भन्नाट व्हायरल झाला असून. २ कोटी २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी या खेळाचा अनुभव घेतला.
सोशल मीडियावरच्या या खेळाला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी सरकारच्या प्रत्यक्ष कामाकडेही तरुणांचं लक्ष आहे. निवडणूक जवळ आल्यानं सगळेच पक्ष सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने सक्रिय होत आहेत. सध्या तरी नरेंद्र मोदी आपके बारे में क्या सोचते है या खेळाद्वारे तरुणांना आकर्षित करण्यात भाजपनं आघाडी घेतली आहे.