अमित जोशी, झी २४ तास, मुंबई: गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा इथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्यावेळी प्रमाणित कार्यान्वित प्रणाली (SOP) न पाळल्याबद्दल पोलिस उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना निलंबित करण्यात आले आहे. गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत ही घोषणा केली. काळे यांनी कुरखेडा हल्ल्याच्यावेळी नक्षलवादी भागांत लागू असलेल्या एसओपीचे पालन केले नसल्याचे स्पष्ट झाले होते.
यानंतर विधानपरिषदमध्ये लक्षवेधी प्रश्नाद्वारे गडचिरोलीतील कुरखेडा नक्षलवादी हल्लाबद्दलचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर विधानपरिषदमध्ये जोरदार चर्चा झाली.
पोलिस उपविभागीय अधिकारी काळे यांच्याबद्दल स्थानिक लोकांच्या भावना तीव्र असल्याचा मुद्दाही विरोधी पक्षांनी उपस्थित केला. तसेच बीड जिल्हयातील संबंधित नलक्षलवादी हल्ल्यात शहीद सैनिकांच्या पत्नीला नोकरी देण्याचा मुद्दाही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लावून धरला. तेव्हा शहिद सैनिकाच्या पत्नीचा नोकरीसाठी अर्ज आल्यावर सात दिवसांत नोकरी देण्याबाबात निर्णय दिला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.
१ मे रोजी महाराष्ट्र दिनी कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर जवानांचे खासगी वाहन आले असता नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. यामध्ये सी- ६० पथकाचे १६ जवान शहीद झाले होते. १ मेच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी पुराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दादापूरजवळ रस्ता निर्माणासाठीच्या जवळपास ३० गाड्या पेटवून दिल्या होत्या. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याने तात्काळ अतिरिक्त कुमक दादापूरला पाठवण्याचे आदेश दिले. या आदेशाचे पालन करताना प्रथमदर्शनी असे दिसून आले होते की, की १५ जवानांना गाडीत कोंबून पाठवताना शीघ्र कृती दलाने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे (SOP) पालन केले नव्हते.