प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : सणांचा राजा, प्रकाशाचा उत्सव म्हणून दिवाळीची ओळख आहे. आनंदाचा सण असलेली ही दिवाळी सर्वांसाठीच खास असते. पण यंदा काही मुंबईकरांची दिवाळी आणखी आनंदी, खास केली ती रेल्वे पोलिसांनी...
रेल्वे पोलिसांनी यंदा काही मुंबईकरांची दिवाळी अधिक खास, आणखी आनंदाची आणि सुखाची केली आहे. रेल्वेमध्ये चोरीला गेलेला तब्बल ८१ लाखांचा मुद्देमाल रेल्वे पोलिसांनी दिवाळीच्या तोंडावर परत केला आहे.
यामध्ये जवळपास सव्वा किलोचे दागिने, पावणे चार लाख किमतीचे लॅपटॉप, सव्वा लाख किमतीचे मोबाईल आणि साडे ४६ लाखांची रोख रक्कम परत करण्यात आली आहे.
वस्तू चोरीला गेलेल्या तक्रारदारांचा शोध लावून, संबंधित न्यायालयाची परवानगी घेऊन सर्व मुद्देमाल त्या, त्या तक्रारदारांना परत केल्याचं, रेल्वे पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांनी सांगितलं.
अशाप्रकारे हरवलेला, कष्टाचा पैसा ऐन धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मिळणं ही फारच आनंद द्विगुणीत करणारी गोष्ट आहे. पण तरीही रेल्वेतून प्रवास करताना आपापल्या वस्तूंची नक्की काळजी घेणं आवश्यक आहे.