मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार अद्याप मान्सूनचा परतीचा प्रवास सुरुच झालेला नाही. राजस्थानसह अनेक उत्तर भारतीय राज्यांमध्ये पुढचे दोन आठवडे मान्सून सक्रीय असणार आहे. हा अंदाज पुढील दोन आठवड्यांसाठी म्हणजेच २ ऑक्टोबरपर्यंत वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतात सामान्यपणे मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेबरच्या अखेरीलाच सुरू होतो.
महाराष्ट्रातून १ ऑक्टोबरच्या सुमारास मान्सून आटोपलेला असतो. पण यंदा मान्सूनची सुरुवातच उशीरा झाल्यानं त्याचा मुक्कामही चांगलाच लांबणार असा अंदाज आहे. त्यामुळे गणपती पावसात गेल्यावर आता दसरा आणि दिवाळीही पावसातच जाईल की काय अशी चिंता नागरिकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे.
२३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या काळात तळ कोकण आणि गोव्यात सर्वत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.