मुंबई : शिवसेनेला गांडुळाच्या अवलादीची उपमा देणाऱ्या अजित पवारांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषेत सडेतोड उत्तर दिले आहे. शिवसेनेचे मुखपक्ष सामनातून अजित पवारांचा समाचार घेतला आहे. तुम्ही छत्रपती शिवरायांच्या अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात, या शब्दात सामनाच्या अग्रलेखातून उत्तर दिलं आहे.
शरद पवारांनी जे कमावले ते अजित पवारांनी अल्पावधीतच गमावले. त्यामुळेच 75 व्या वर्षातसुद्धा पक्षबांधणीसाठी पवारांना वणवण करावी लागत असल्याची टीका, सामनातून करण्यात आली आहे. आम्हाला गांडूळ म्हणणाऱ्यांना दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल. म्हणून तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असंच म्हणावं लागेल, असा हल्ला शिवसेनेने चढवला आहे.
अजित पवार यांचे राजकारण आता बारामतीपुरतेसुद्धा उरलेले नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी अजित पवारांना जवळजवळ माती खायला लावलीच होती. अनेक दिवस ते त्या मातीत गाडलेले आपले तोंड बाहेर काढायला तयार नव्हते. महापालिका निवडणुकीत पुणे व पिंपरी-चिंचवडचे संस्थानही धुळीस मिळाले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदही राहिलेले नाही. त्यांच्या पक्षाचा जीर्ण सांगाडा झाला आहे. तरीही हे सांगाडे ‘हल्लाबोल’ यात्रेच्या नावाखाली उसने अवसान आणत आहेत हा विनोदच म्हणायला हवा. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवारांची पत ती काय, पण तरीही त्यांच्या जिभेचा गांडूळ अधूनमधून वळवळत असतो. कालच त्यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेची संभावना ‘गांडुळाची अवलाद’ अशी केली. शिवसेनेच्या गांडुळाचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही असे ते म्हणाले. आता आमच्या गांडुळाचा मुका घेण्याचा प्रयत्न अजित पवारांनी कधी केला हे त्यांनी एकदा सांगून टाकावे. अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी गांभीर्याने घेत नाही. त्यांना जो काही मानसन्मान आतापर्यंत मिळाला तो त्यांच्या आदरणीय काकांमुळे. पण काकांनी संपूर्ण संधी व पाठबळ देऊनही अजित पवारांना नेतृत्व उभे करता आले नाही. कारण त्यांचे तोंड व जीभ म्हणजे भ्रष्ट गटार आहे व येणाऱ्या-जाणाऱ्यांवर त्यांच्या गटारी तोंडाने थुंकून ते घाण करीत असतात.
काकांनी पन्नास वर्षांत कमावले ते अजित पवारांनी अल्पावधीत गमावल्यामुळेच शरद पवारांना ७५ व्या वर्षीसुद्धा पक्षबांधणीसाठी वणवण करावी लागत आहे. अजित पवार म्हणतात की, शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे. मग काय हो अजितराव, तुम्ही स्वतः दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय? गांडूळ हा निदान शेतकऱ्यांचा मित्र तरी आहे. गांडुळास दोन तोंडे आहेत की चार तोंडे याचा शोध नंतर लावू, पण तुम्ही मात्र रावणाप्रमाणे दहा तोंडांनी बोलत असता. प्रश्न इतकाच आहे की, शिवसेनेने सत्तेत राहून काय केले असा प्रश्न तुम्हाला आता पडाला आहे, पण इतकी वर्षे सत्तेच्या खुर्च्या उबवून फक्त स्वतःचे हित साधण्यापलीकडे आपले महाराष्ट्रासाठी नक्की योगदान ते काय? शेतकरी हक्काचे पाणी मागायला तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही त्यांना ‘मूत्र’ पाजण्याची भाषा केलीत. हेच तुमचे शेतकरीप्रेम! मग त्या अर्थाने तुम्हाला दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असे म्हणावे लागेल. जो गुन्हा छिंदमने केला तोच गुन्हा मंत्रीपदावर असताना तुम्ही तेव्हा केला.
शिवसेनेला मी दिलेली गांडुळाची उपमा त्यांना इतकी लागली, की त्यांच्या पोटातील सगळं बाहेर पडलं, या शब्दात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी 'सामना'तून झालेल्या टीकेवर उत्तर दिलं. शिवसेनेला दिलेली गांडुळाची उपमा इतकी झोंबली, की त्यांच्या पोटातील सगळं बाहेर पडलं. आता त्यांचं खरं, की माझं, याचा निर्णय जनताच घेईल, असंही अजित पवार म्हणाले.