महिला कर्मचारी- हल्लेखोरात वाद, सैफ मध्यस्थीसाठी गेला अन्...; मध्यरात्री काय घडलं?

Saif Ali Khan Attacked: सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 16, 2025, 10:56 AM IST
महिला कर्मचारी- हल्लेखोरात वाद, सैफ मध्यस्थीसाठी गेला अन्...; मध्यरात्री काय घडलं? title=
Saif ali khan accused argued with his maid when actor tried to intervene he attacked on him

Saif Ali Khan Attacked: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरात चाकूने हल्ला करण्यात आला आहे. सैफवर हल्ला करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून या हल्ल्यात सैफला गंभीर जखम झाली आहे. सैफच्या वांद्र्यातील घरी मध्यरात्री 2च्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती घुसला त्यानंतर त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. सैफवर चाकूने सहा वार करण्यात आले असून त्यातील दोन जखमा गंभीर असून त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सैफवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र ही घटना नेमकी कशी घडली? घटनाक्रम जाणून घेऊया.

सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे. त्याचबरोबर पीआरकडून एक अधिकृत स्टेटमेंटदेखील रिलीज करण्यात आले आहे. अज्ञात व्यक्ती हा घरात घुसला होता. त्यानंतर त्या व्यक्तीची घरातील महिला मदतनीसासोबत वाद झाला. दोघांच्या आवाजाने सैफ बेडरुममधून बाहेर आला आणि दोघांत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सैफ अली खानने मध्यस्थी केल्यानंतर तो व्यक्ती अधिक आक्रमक झाला आणि त्यातून त्याने सैफवर चाकूने वार केला. आरोपीने सैफवर 6 वार केले. 

सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती रात्रभर घरात दबा धरुन बसली होती. रात्री २ वाजता त्याचा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सूरु असल्याचा आवाज सैफला आला. त्यानंतर तो बाहेर आला आणि हा प्रकार घडला. सैफ अली खानच्या इमारतीत पॉलिशिंगचं काम सुरू आहे. त्या मजूरांपैकी कोणी होता का याचा तपास पोलिस करत आहेत. 

दरम्यान, इतकी सुरक्षा असतानाही तो अज्ञात व्यक्ती सैफच्या घरी कसा पोहोचला हा प्रश्न उपस्थित होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात एक पाइपलाइन आहे जी बेडरुमपर्यंत पोहोचते. त्यामुळं याच पाइपलाइनवर चढून चोर घरात शिरला असू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, हल्लेखोर हा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का? तो आत कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता का? याचा पोलिस तपास करत आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफला 6 ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यातील एक गळ्यावर, मणक्याजवळील वार गंभीर आहे. सध्या सैफवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. सैफची मदतनीसदेखील या हल्ल्यात जखमी झाली असल्याचे समोर आली आहे.