नवी दिल्ली : एनडीएतून कोणाला विचारून नारळ दिला असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. आम्ही एनडीएचे संस्थापक आहोत. आम्ही कठीण काळातही एनडीएत राहिलो. आम्हाला बाहेर काढताना घटकपक्षांशी मसलत केलीत का असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.
महाराष्ट्र सत्ता स्थापनेचं केंद्र आता दिल्ली बनलंय. सोनिया गांधी शरद पवार यांची बैठक झाल्यावर संजय राऊत शरद पवारांची भेट घेणार आहेत. तसंच नागरिकता सुधारणा विधेयकावरही शिवसेना सरकारवर हल्लाबोल करणार आहे. राष्ट्रहिताचे मुद्दे शिवसेना संसदेत उचलेल असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपाला संसदेत विरोध करण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होतं आहे. या अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा विधेयकासह अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर करुन घेण्याचं आव्हान मोदीपुढे आहे. विधेयकांसह अनेक मुद्यांवरून या अधिवेशनात भाजप सेना आमने-सामने उभे ठाकण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर एनडीएतून शिवसेना बाहेर पडली आहे. त्यामुळे आता शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर बसलेली पाहायला मिळेल आणि मोदी सरकारच्या धोरणांचा जोरदार विरोधही करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये दिल्लीत सत्तास्थापनेच्यादृष्टीनं चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.