विनोद पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्य शिखर बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात 'ईडी'ने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारने निवडणुकीच्या तोंडावर जाणुनबुजून ही कारवाई केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
मात्र, आता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीदेखील शरद पवार यांची पाठराखण केली आहे.
मी विरोधी पक्षनेता असल्यापासून विधानसभेत राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहाराचा पाठपुरावा केला आहे. सुरुवातीपासून या गैरव्यवहारात कुठेही शरद पवार यांचे नाव नव्हते, हे मी जबाबदारीने सांगू शकतो. त्यामुळे आता अचानक गैरव्यवहारात शरद पवारांचे नाव कसे पुढे आले, याबाबत खडसेंनी शंका व्यक्त केली.
सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेत्याने अशी शंका उपस्थित केल्याने विरोधकांच्या दाव्याला बळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विरोधक आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शरद पवार यांनीही स्वत:वरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आगामी काळात निवडणुकीसाठी मुंबईबाहेर असल्याने मी स्वत:हून २७ सप्टेंबरला 'ईडी'च्या कार्यालयात जाणार आहे. त्यांचा काही पाहुणचार असेल तर तोही घेईन, असे पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणुकीची वेळ साधून सरकारकडून जाणीवपूर्वक ही कारवाई करण्यात आल्याचा अप्रत्यक्ष आरोपही पवार यांनी केला होता.
माझ्या राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. या दौऱ्याला सामान्य जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अशी काहीतरी कारवाई होणार, याची शंका मला होतीच. आता 'ईडी'ने गुन्हा दाखल केल्यामुळे ही शंका खरी ठरली आहे. राज्यातील जनता हे सर्व पाहत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते.